‘मला अटक करा, आणखी १ सहस्र खटले भरा, मला चकमकीत मारा, नाहीतर मला फाशी द्या; पण गोरक्षण आणि माझ्या धर्माची सेवा करण्यासाठी माझे जीवन आहे. त्यासाठी मरण आले, तरी मला त्याची चिंता नाही’, असे म्हणणारे भाजपचे भाग्यनगर (हैद्राबाद) येथील प्रखर धर्माभिमानी आमदार श्री. टी. राजासिंह ! श्री. टी. राजासिंह यांनी जीव धोक्यात घालून लक्षावधी गायींचे प्राण वाचवले आहेत. ते तेलंगाणातील लोकप्रिय हिंदुत्वनिष्ठ नेते असून केवळ हिंदुत्वाच्या बळावर भाग्यनगरच्या गोशामहल मतदारसंघातून ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर, हिंदु देवतांचे विटंबन अशा हिंदूंवरील विविध आघातांच्या विरोधात प्रखरतेने लढतात, हिंदूंचे संघटन करतात, तसेच विविध सभांमधून त्यांचे प्रबोधनही करतात.
महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांना ७७ दिवस कारागृहात रहावे लागले. श्री. राजासिंह यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले; म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर १७१ हून अधिक गुन्हे नोंदवले आहेत. ‘सातत्याने हिंदुहिताचा विचार करणारे श्री. राजासिंह यांची हिंदु धर्मावर पुष्कळ श्रद्धा आणि विश्वास आहे. मुसलमानबहुल भाग्यनगरमध्ये राहून हिंदुत्वाचे प्रखरतेने कार्य करत असल्याने ते संपूर्ण देशातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये ‘टायगर राजा सिंह’ या नावाने लोकप्रिय आहेत. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, हेच त्यांचे स्वप्न आहे.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. ६ मुली आणि एकच मुलगा असूनही आई-वडिलांचा धर्मकार्यासाठी राजासिंह यांना पाठिंबा
श्री. टी. राजासिंह हे लोध, म्हणजेच राजपूत समाजातील आहेत. त्यांचे कुटुंब एकेकाळी शिल्प बनवायचे. श्री. राजासिंह हेही प्रारंभी हेच काम करायचे. नंतर त्यांनी ‘ऑडिओ’ आणि ‘व्हिडिओ’ कॅसेट विकायला प्रारंभ केला. त्यांच्या आई-वडिलांना ६ मुलींसह ते एकटेच आहेत. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबाचे पूर्ण दायित्व आले. आई-वडील असतांनाच एकदाच त्यांनी सर्व कुटुंबाला एकत्र करून सांगितले, ‘‘आक्रमक मुसलमान आणि धर्मपरिवर्तन घडवणारे ख्रिस्ती प्रचारक यांना विरोध करणे, हे आपले कर्तव्य आहे. हे कार्य हिंदुत्वाला विरोध असणार्या शासनकर्त्यांना नको आहे. त्यामुळे हे कार्य थांबवण्यासाठी पोलीस राजकीय दडपणाखाली सतत प्रयत्न करत असतात. या कार्यामुळे सांप्रदायिक तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे ते त्यांचा आमचा छळ करतात. अशा वेळी त्यांनी काय करावे ?’’ त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी सांगितले, ‘‘तू चांगले कार्य करत आहेस. निर्धास्त रहा. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तू भाग्यवान आहेस. प्रत्येकाच्या भाग्यात हे कार्य येत नाही. तू गतजन्मी काही पुण्याई केली असणार; म्हणून हे धर्मकार्य तुला करायला मिळत आहे !’’
२. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि टी. राजासिंह यांचा संबंध
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि टी. राजासिंह यांची सध्या तुलना केली जाते. ‘योगी आदित्यनाथ उत्तरेत आणि श्री. टी. राजासिंह हे दक्षिणेत हिंदुहृदयसम्राट आहेत’, असे हिंदुत्वनिष्ठांना वाटते. श्री. राजासिंह तेलंगाणाच्या विधानसभा निवडणुकीत उभे असतांना त्यांच्यासाठी स्वत: योगी आदित्यनाथ प्रचारसभा घेतात. श्री. राजासिंह हे योगींना आदर्श मानतात. त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेही प्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावलेले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी राजासिंह यांचा भाव !

१. गोवा येथे झालेल्या द्वितीय ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’नंतर जुलै २०१३ मध्ये सनातनचे साधक त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी ते म्हणाले, ‘कधी कधी मी विचार करतो की, प.पू. गुरुदेवांनंतर हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी कुणी येईल, असे वाटत नाही. हे कार्य प.पू. गुरुदेवच करू शकतात.’
२. एका कार्यक्रमात श्री. राजासिंह म्हणाले, ‘‘तुम्हाला जर कलियुगात जिवंत रूपातील ईश्वराचे दर्शन घ्यायचे असेल, तर सध्या भूतलावर असलेली व्यक्ती, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले होय. ज्याप्रकारे आपण कुणीही साधू-संत यांचे दर्शन घेतल्यावर आपल्याला शक्ती मिळाल्याचे जाणवते, तसे मला प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र बघितल्यावर जाणवते.’’
३. एकदा श्री. राजासिंह म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मोठे धर्मकार्य होत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला येथे धर्मकार्य करण्याची संधी मिळत आहे. आम्ही हिंदूंनी धर्मकार्य करण्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे.’’
३. टी. राजासिंह यांचा राजकारणातील प्रवेश
वर्ष १९९२ मध्ये बाबरीचा ढाचा पाडण्यात आला. तेव्हा धर्मांधांनी भारतात दंगली केल्या. भाग्यनगर अधिक संवेदनशील असल्याने तेथे त्याचा अधिक परिणाम झाला. त्या वेळी हिंदूंना जागृत करण्यासाठी श्री. राजासिंह यांनी त्यांच्या सहकार्यांसह ‘हिंदु वाहिनी’ या संघटनेमध्ये सहभागी होऊन हिंदुत्वाचा प्रचार केला. वर्ष २००० पासून त्यांनी आंध्रप्रदेशात ‘हिंदु वाहिनी’ या संघटनेच्या माध्यमातून कार्य चालू केले. त्या वेळी त्यांच्या भागातील हिंदूंच्या वस्त्यांवर मुसलमानांकडून अनेक आक्रमणे होत असत. त्यांनी एक गट बनवून या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला.
त्यांनी धर्मांतराचा प्रयत्न करणार्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनाही त्यांच्याच व्यासपिठावर जाऊन विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे संयुक्त आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस्. राजशेखर रेड्डी (काँग्रेस) यांच्या सरकारने श्री. सिंह आणि त्यांचे कार्यकर्ते यांना खोट्या आरोपाखाली ६ मास कारागृहात ठेवले. पोलिसांकडून श्री. सिंह यांना चकमकीत ठार मारण्याचेही प्रयत्न झाले. कारागृहातून बाहेर पडल्यावर सरकार-पोलीस यांच्याकडून त्यांच्यावर अत्याचार होत होते, तसेच खोटे गुन्हे नोंदवले जात होते.
कारागृहातून बाहेर पडल्यावर एका अधिकार्याने त्यांना या त्रासातून सुटका करण्यासाठी राजकारणात जाण्याचा सल्ला दिला. वर्ष २००९ मध्ये महापालिकेच्या स्थानिक निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीत ते ‘तेलुगु देसम्’ पक्षाच्या तिकिटावर (त्या वेळी त्यांना काही कारणाने भाजपचे तिकीट मिळू शकले नाही.) नगरसेवक म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकारणाला प्रारंभ झाला.
नगरसेवक झाल्यानंतर त्यांचा धर्मकार्यातील सहभाग वाढला. त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी गोरक्षणाची चळवळ चालू केली. त्यांच्या हिंदुत्वाच्या कार्यामुळे त्यांच्या क्षेत्रात २-३ वेळा धार्मिक तणाव निर्माण झाला. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना ‘तेलुगु देसम्’ पक्ष सोडून दुसर्या पक्षात जाण्यास सांगितले. त्यानुसार श्री. राजासिंह यांनी वर्ष २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तेलंगाणाच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत श्री. राजासिंह आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या क्षेत्रात हिंदु-मुसलमान एकत्र रहातात. मुसलमानांच्या सणांनाही ते साहाय्य करतात. श्री. राजासिंह आमदार असले, तरी स्वतःला आधी हिंदु समजतात. ‘राजकारण जनता निवडून देईल, तोपर्यंतच आहे. मला हिंदुत्वासाठी जगायचे आहे. मी धर्मासाठी राजकारण कधीही सोडू शकतो. देश आणि धर्म यांसाठी मी मरायलाही सिद्ध आहे’, असे त्यांना वाटते.
४. धर्मरक्षणासह विधानसभा क्षेत्राचा विकास
टी. राजासिंह वर्षभर हिंदुत्वरक्षणाचे कार्य करत असले, तरी त्यांचे त्यांच्या क्षेत्रातील जनतेकडेही लक्ष असते. हिंदुत्वाचे कार्य करतांना त्यांनी विकासकामांकडे दुर्लक्ष केले नाही. गोशामहल येथे सांडपाणी (ड्रेनेज) आणि रस्ते यांची समस्या मोठी होती. ती समस्या सोडवत त्यांनी वर्ष २०१४ ते २०१८ आणि २०१८ ते २०२३ या ९ वर्षांत गोशामहलमध्ये ५०२ कोटी रुपयांची कामे केली.
५. ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात लढा
वर्ष २००५ मध्ये ख्रिस्ती प्रचारकांनी श्री. राजासिंह यांच्या घराजवळील हिंदूंचे धर्मांतर करणे चालू केले. एका ख्रिस्ती युवकाने त्यांच्या शेजारी रहाणार्या एका कार्यकर्त्याच्या बहिणीला पळवून नेऊन तिच्याशी बळजोरीने लग्न केले. त्याचा श्री. सिंह आणि त्यांचे सहकारी यांनी विरोध करताच पोलिसांनी त्यांना ८ दिवस पुष्कळ मारले, तसेच पोलिसांच्या कह्यात असतांना २ पाद्र्यांनीही त्यांच्यावर अत्याचार केले. त्यामुळे त्यांनी सुटून आल्यावर छळणार्या त्या दोन पाद्र्यांना धडा शिकवला. त्यानंतर पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पकडून मारहाण केली.
एक मासानंतर श्री. सिंह आणि त्यांचे सहकारी यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांनी ६ मास कारावास भोगला. हा खटला हिंदुत्वनिष्ठ जिंकले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात कुणी ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी आला, तर त्याला यथोचित धडा शिकवण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांच्या भागातील धर्मांतराचे प्रयत्न पूर्णपणे थांबले.
६. राजासिंह यांना १ सहस्र धर्मांध खाटिकांच्या आक्रमणातून गावकर्यांनी वाचवणे

वर्ष २०११ मध्ये श्री. राजासिंह आणि त्यांचे २५ कार्यकर्ते यांच्यावर पुष्कळ मोठे आक्रमण झाले. अनुमाने १ सहस्र धर्मांध खाटिकांनी श्री. राजासिंह यांना रस्त्यात घेरले. ते त्यांना ठार मारणार, तेव्हा काही कळायच्या आत अचानक जवळच्या गावातून काही लोक लाठ्याकाठ्या घेऊन आले आणि त्यांनी गोरक्षकांना वाचवले.
७. धर्मप्रबोधनाच्या माध्यमातून ४ वर्षांत ५०० प्रखर धर्माभिमानी कार्यकर्त्यांची निर्मिती
श्री. राजासिंह यांनी धर्मरक्षण करतांना प्रत्येक क्षेत्रातील युवकांना जवळ करून त्यांच्या मनात राष्ट्र-धर्माविषयी जागृती निर्माण करण्यास प्रारंभ केला. युवकांना ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ काय ?’, ‘कपाळाला टिळा का लावायचा ?’, ‘गोमातेचे रक्षण आणि सेवा करून काय लाभ होतो ?’, ‘ख्रिस्ती धर्मप्रचारकांना जर आपण हिंदूंच्या वस्तीत येऊ दिले, तर आपले भविष्य काय असेल ?’, अशी सूत्रे सांगितली. त्यामुळे वर्ष २००० ते २००४ या काळात त्यांच्याकडे धर्मासाठी लढणारे ५०० कार्यकर्ते सिद्ध झाले.
८. टी. राजासिंह यांना जिवे मारण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न
अ. श्री. राजासिंह यांना पाकिस्तान, सौदी अरेबिया, दुबई येथून ठार मारण्याच्या धमक्या येतात. भाग्यनगरहून अटक केलेले इसिसचे ५ आतंकवादी राजासिंह यांची हत्या करणार होते. त्यासाठी मे २०१६ मध्ये त्यांच्या घराचे ३ वेळा अवलोकन करण्यात आल्याचे चौकशीतून समजले.
आ. आंध्रप्रदेशमधील नागपल्ली न्यायालयात भाग्यलक्ष्मी मंदिराच्या संदर्भातील खटल्याच्या निमित्ताने २१.३.२०१४ या दिवशी श्री. राजासिंह गेले होते. या वेळी न्यायालयाबाहेर धर्मांध मुसलमान असलेली एक इनोव्हा चारचाकी गाडी संशयास्पदरित्या फिरत होती. श्री. राजासिंह यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी या गाडीची पडताळणी केली. तेव्हा त्यात मोठ्या संख्येने तलवारी आणि लोखंडी सळ्या सापडल्या.
इ. १८.१०.२०१५ या रात्री ३ वाजता नवरात्रीच्या कार्यक्रमावरून घरी परततांना अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.
ई. श्री. राजासिंह हे महाराष्ट्रातील बीड येथे ८.४.२०१८ या दिवशी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत मार्गदर्शनासाठी गेले होते. सभेनंतर ते पोलीस संरक्षणात स्वतःच्या चारचाकी वाहनातून परत निघाले असता बीड-सोलापूर रस्त्यावर समोरून येणार्या एका कंटेनरच्या माध्यमातून त्यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कंटेनर तेलंगाणातील धर्मांधाचा असल्याचे चौकशीत पुढे आले.
उ. एका रात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांना चकमकीत ठार करण्यासाठी नेले. त्यांना न्यायला आलेला पोलीस अधिकारी धार्मिक वृत्तीचा होता. ‘सरकारने तुम्हाला चकमकीत ठार करण्याचे आदेश दिले, तुम्ही काय केले ?’, असे अधिकार्याने विचारले. राजासिंह यांनी त्यांचे काम समजावून सांगितल्यावर अधिकार्याने तो गुन्हा नसल्याचे सांगितले. चकमकीची वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यावर चकमकीचा निर्णय रहित केला.
९. राजासिंह यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही देश अन् धर्म यांच्या कार्यासाठी सिद्ध करणे
श्री. राजासिंह यांच्या पत्नी सौ. उषा सिंह याही हिंदुत्वनिष्ठ आहेत. राष्ट्र-धर्मासाठी ते स्वत: व्यस्त असतांना स्वतःच्या पत्नीलाही धर्म कार्यासाठी सिद्ध करतात. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी पत्नीला सक्षम करण्याची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती केली. ‘देशात धर्म टिकला, तरच आपले घर टिकेल. धर्म नसेल, तर घरी बसून काय करणार ?’, असे त्यांना वाटते. त्यामुळे त्याही धर्मकार्यात सहभागी असतात. त्यांचे पती कट्टर हिंदुत्वनिष्ठ असल्याचा त्यांना अभिमान आहे. श्री. राजासिंह हे त्यांच्या मुलांवरही धार्मिक संस्कार व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. परिणामी त्यांचा मुलगा कु. चंद्रशेखर सिंह हाही भारतात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी योगदान देण्यास सिद्ध होत आहे.
राजासिंह यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पानांवर बंदी !

श्री. राजासिंह यांच्या कथित आक्षेपार्ह भाषणांमुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमांनी वर्ष २०२० मध्ये त्यांच्या पानांवर अन् खात्यांवर बंदी घातली आहे.
१०. ‘श्रीराम चॅनेल’ वाहिनीला प्रारंभ
वर्ष २०१० च्या हनुमान जयंतीला त्यांनी मोठी शोभायात्रा काढण्याचे ठरवले. त्याच कालावधीत मुसलमानांनी भाग्यनगरमधील मोठ्या हनुमान मंदिरावर आक्रमण करून दगडफेक केली. त्याचा प्रतिकार करण्यासाठी हिंदु युवक एकत्र आल्यावर स्थानिक ‘फोर टीव्ही’ नावाच्या वृत्तवाहिनीने हिंदूंच्या विरोधात अपप्रचार करून मुसलमानांना चिथावणी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी एकत्र येत हिंदूंची मंदिरे, दुकाने, गोशाळा आदींवर आक्रमणे केली. या दंगलीचाही ‘फोर टीव्ही’सह अन्य स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हिंदूंच्या विरोधात खोटा प्रचार केला. त्यानंतर ‘हिंदूंचीही एक वाहिनी असावी’, हे लक्षात घेऊन महत्प्रयासाने ‘श्रीराम चॅनेल’ नावाची वाहिनी चालू केली.
भाग्यनगरमध्ये श्रीराम शोभायात्रेचे भव्य आयोजन

वर्ष २०१० पासून मुसलमानांनी ‘मिलाद-उल-नबी’ हा त्यांचा सण अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करायला प्रारंभ केला. प्रत्येक गल्ली, चौक आणि रस्ते यांवर हिरवे झेंडे लावणे, ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत फेर्या काढणे, टिळा लावून जाणार्या हिंदूंवर आक्रमण करणे, मंिदरांची तोडफोड करणे, असे प्रकार चालू झाले. ५ दिवस तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या मूकसंमतीने हा स्वैराचार चालू होता. त्यामुळे श्री. राजासिंह यांनी श्रीरामाची प्रतिमा बनवून श्रीरामनवमीला फेरी काढली. या फेरीत १ लाखांहून अधिक कार्यकर्ते फेरीसाठी आले. त्यानंतर पोलिसांनी श्री. राजासिंह आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंदवला अन् त्यांना ४५ दिवसांचा कारावास झाला. वर्ष २०१४ मध्येही श्री. राजासिंह यांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत अडीच लाख हिंदूंनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीच्या वाटेवर असणारी मशीद प्रशासनाकडून दक्षतेची उपाययोजना म्हणून झाकून ठेवण्यात येते.
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !