संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश !

सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा प्रवेश करतांना उसळलेला अलोट जनसागर आणि वारकरी भाविक

सोलापूर – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा अंतिम टप्प्यातील प्रवास आता चालू झाला. १९ जुलैला पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे स्वागतासाठी भव्य अशी कमान उभारण्यात आली आहे. पालखीच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीने २१ तोफांची सलामी देण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी अलोट जनसमुदाय लोटला होता. धर्मपुरी येथे माऊलींची आरती झाल्यावर काही काळ विसावा झाला आणि सायंकाळी पालखी नातेपुते येथे विसाव्यासाठी रवाना झाली.

पालखी मार्गावर दुभाजकावर लाल, पिवळी, पांढरी फुले माऊलींच्या स्वागतासाठी लावण्यात आली आहेत. नातेपुते येथे पालखीतळावर जय्यत सिद्धता करण्यात आली असून मुरूमीकरण करण्यात आले आहे. शहरात सुलभ शौचालय, हिरकणी कक्ष, आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत. वारीतील वारकर्‍यांना पिण्यासाठी १०० नळांची व्यवस्था करण्यात आली आहे.