अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी भाजप महिला आघाडीची मागणी

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – बांदा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील संशयीत आरोपी अबूसाद इब्राहिम शहा याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाचे निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद अन्वेषण करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने बांदा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये दोषीवर कठोर कारवाई झाल्यास समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास साहाय्य होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, अशी मागणी भाजपच्या बांदा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा रूपाली शिरसाट यांनी केली.

या वेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, महिला आघाडीच्या स्मिता पेडणेकर, माधवी गाड, अवंती पंडित, भाजपचे बांदा शहराध्यक्ष नीलेश नाटेकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन पोलीस अधिकार्‍यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिले.