महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त रवी पवार यांचा पुतण्या असल्याचे खोटे सांगून ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या विजेंद्र पवार याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. विजेंद्र पवार माजी जिल्हाधिकार्‍यांचा मुलगा असल्याचे अन्वेषणात समोर आले. दिशांत ताटे नावाच्या तरुणाला मालमत्तेची थकबाकी असलेला मिळकतकर अल्प करून देण्याचे आमीष दाखवून त्याकडून विजेंद्रने पैसे घेतले होते; मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने ताटे यांनी मिळकतकर विभागात चौकशी केली असता रवी पवारांचा विजेंद्र नावाचा कुणी पुतण्या नसल्याचे त्यांना समजले. (पैसे घेणार्‍याइतकाच पैसे देणाराही तितकाच दोषी आहे. ही व्यवस्थाच मोडून काढायला हवी. – संपादक) विजेंद्र पवार महापालिका भवनमध्ये पुन्हा आला असतांना सुरक्षारक्षकांनी त्याला ओळखून पोलिसांच्या स्वाधीन केले. महापालिकेतील निलंबित अधीक्षक अभियंता असित जाधव यांनी आयुक्तांना पाठवलेल्या संदेशात पवार संदर्भातील उल्लेख आढळला असून हीच ती व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले.