आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार हिंदु पद्धतीने होणार अंत्यसंस्कार
गोव्यात २ दिवस राजकीय दुखवटा घोषित

पणजी, १९ जुलै (वार्ता.) – ताळगाव मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार तथा माजी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आमदार जेनिफर मोन्सेरात कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांचे वय ५१ वर्षे होते. आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मुलगा तथा पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, मुलगा अमित मोन्सेरात, सुना आणि नातवंडे, असा परिवार आहे. विशेष म्हणजे आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्यावर त्यांच्या इच्छेनुसार हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव २० जुलै या दिवशी सेंट मायकल चर्च, ताळगाव येथे ठेवले जाणार आहे आणि सांत इनेज येथील हिंदु स्मशानभूमीत दुपारी ४.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय
माजी मंत्री आणि ताळगावच्या पहिल्या महिला आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी ताळगावसह गोव्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! – डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनावर राज्यभरातील नागरिक आणि राजकीय नेते यांनी शोक व्यक्त केला आहे.
राज्यात २ दिवस राजकीय दुखवटा
राज्य सरकारने आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे गोव्यात १९ आणि २० जुलै या दिवशी राजकीय दुखवटा घोषित केला आहे. या कालावधीत राज्यभरातील सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे, तसेच या काळात कोणतेही अधिकृत शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
आमदार जेनिफर मोन्सेरात यांची राजकीय कारकीर्द
जेनिफर मोन्सेरात यांनी वर्ष २००७ मध्ये ‘युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी’ या पक्षाच्या वतीने सांताक्रूझ मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर वर्ष २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर गोव्यातील ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. वर्ष २०१७ च्या निवडणुकीतही ताळगावच्या जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा विजयी होणार्या गोव्याच्या पहिल्या महिला आमदार ठरण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
जुलै २०१९ मध्ये गोव्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांचे पती बाबूश मोन्सेरात यांच्यासह अन्य काँग्रेस आमदारांसमवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळवला. त्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर विधानसभेच्या इतिहासात मंत्री बनणार्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. या काळात त्यांनी महसूल, माहिती तंत्रज्ञान, कामगार आणि रोजगार यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला. राजकीय पदांखेरीज जेनिफर मोन्सेरात यांनी मार्च २०१३ पासून ‘गोवा राज्य महिला आयोगा’च्या समिती सदस्या म्हणून सलग ३ वर्षे काम पाहिले होते. ताळगाव मतदारसंघातील विकासकामांवर आणि महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांनी विशेष भर दिला होता. सलग ३ वेळा आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्या जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाने गोव्याने लोकाभिमुख महिला नेतृत्व गमावले आहे.
गोवा विधानसभेचे संख्याबळ घटून झाले ३८
जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनानंतर गोवा विधानसभेचे संख्याबळ सभापतींसह ३८ वर आले आहे. यापूर्वी अनुमाने ९ महिन्यांपूर्वी कृषीमंत्री रवि नाईक यांचे निधन झाले होते. सध्याच्या विधानसभा कार्यकाळात आमदाराच्या निधनाची ही दुसरी घटना आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन