उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन !

पंढरपूर – आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ जुलैला श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेतले. या प्रसंगी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. मंदिरे समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन् यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम चालू असून झालेल्या कामांची, तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाविषयी उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉरविषयी नागरिकांशी चर्चा केली आणि ‘विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल’, असे सांगितले.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकर्‍यांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

– दर्शन रांगेतील भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे वारकर्‍यांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पहाणी केली. या वेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्र्यांनी पत्रा शेड येथील रिद्धि-सिद्धि दर्शन मंडपातील रांगेतील भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाळवंटातील स्वच्छतेची पहाणी केली. आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

‘भक्तीसागर’ येथे वारकर्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयात वारकर्‍यांची विचारपूस करतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘भक्तीसागर’ येथे वारकर्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाची त्यांनी पहाणी केली. अतीदक्षता विभागात भरती असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची काळजीपूर्वक विचारपूस केली आणि आधुनिक वैद्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.