थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०७.२०२६)

‘मॅफेड्रॉन’ विक्री करतांना २ मुसलमानांना अटक !

श्रीरामूपर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरात अमली पदार्थ ‘मॅफेड्रॉन’ची विक्री करणार्‍या सोहेल जुबेर शेख याला अटक केली असून त्याचा साथीदार असीफ मुनीर शेख हा पसार झाला आहे. त्याच्याकडून २ लाख ५२ सहस्र ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. (प्रत्येक गुन्ह्यामध्ये मुसलमानांचा सहभाग असणे, हे त्यांच्यावर पोलिसांचा धाक नसल्याचे लक्षण ! – संपादक)


पुढील २-३ दिवस मुंबई-ठाण्यात पाऊस !

मुंबई – शहरातील अनेक भागांत अवघ्या दोन घंट्यांत ३० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम रहाणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई आणि ठाण्ो येथे काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. १९ ते २२ जुलै या कालावधीत मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


खडकवासला (पुणे) धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

पुणे – १० दिवसांपासून खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू होता. जलसंपदा विभागाने त्यात ३०० क्युसेकने वाढ करून पाण्याचा विसर्ग १ सहस्र क्युसेक करण्याचा निर्णय घेतला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस पडत नसतांना आणि धरणसाठ्यात येणारे पाणी अत्यल्प असतांना भविष्यात पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. खडकवासला धरणातील ०.६ अब्ज घनफूट (टी.एम्.सी) पाणी वारीसाठी राखीव होते. त्यातील ०.३ अब्ज घनफूट (टी.एम्.सी) पाणी सोडले होते.

दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील लोकांना पिण्याच्या वापरासाठी हे पाणी देण्यात येणार आहे. याच वेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती आणि इंदापूर तालुक्यांत असल्याने वारकर्‍यांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी विसर्ग वाढवणे आवश्यक आहे. विसर्ग वाढवल्याने हे पाणी एका दिवसात इंदापूर तालुक्यात पोचू शकेल, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिले आहे. सध्या धरणात १.६३ अब्ज घनफूट (टी.एम्.सी) म्हणजे ८२.७३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस येणार हे गृहीत धरून ऐन वेळी विसर्ग वाढवून पूर परिस्थिती निर्माण होण्याऐवजी कालव्यातून विसर्ग वाढवल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. २० जुलै नंतर मात्र हा विसर्ग बंद करण्यात येईल. या विसर्गामुळे पुणे शहराच्या पाण्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.


परभणी येथे ‘सिल्क अँड मिल्क’ पायलट प्रकल्प राबवणार

परभणी – विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न रहाता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. ‘परभणी ग्रोथ हब’ संकल्पनेअंतर्गत १ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ संकल्पनेवर आधारित पायलट प्रकल्प राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी येथे केली. ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ’ येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘उद्यम – विकसित मराठवाडा मिशन’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


शिवसेनेच्या नवी मुंबईच्या महिला नेत्यांना अटक !

नवी मुंबई – भंगार व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या नवी मुंबईच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे एम्.आय.डी.सी. पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि त्यांचे सहकारी यांनी व्यावसायिकाला, तसेच त्याच्या दुकानात काम करणार्‍या कामगाराला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

तक्रारदारांचे नवी मुंबईतील इंदिरानगर परिसरात भंगाराचे दुकान आहे. या परिसरात जर दुकान चालवायचे असेल, तर २ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी  पूजा बनसोडे यांनी दिली होती. पूजा यांचे ४ साथीदार पसार आहेत.