विशेष सदर !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक हिंदु धर्म अन् राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. निधर्मीवादी सरकारांकडून, तसेच प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून होणारा त्रास सहन करत ते निःस्वार्थभावाने केवळ राष्ट्र-धर्मरक्षणासाठी दिवसरात्र संघर्ष करत आहेत. आज राष्ट्रविरोधी शक्ती निधर्मीवाद्यांच्या पाठिंब्याने बलवान होऊन हिंदुविरोधी, तसेच राष्ट्रविरोधी षड्यंत्रे करत असतांना आपल्या मनात ‘हिंदूंचे आणि राष्ट्राचे पुढे काय होणार ?’, अशी चिंता वाटते. त्या वेळी हिंदुत्वाच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी लढणार्या या मावळ्यांच्या, शिलेदारांच्या संघर्षाची उदाहरणे वाचल्यास निश्चितच आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल. त्याचसाठी अशा शिलेदारांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणारे ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ हे सदर चालू केले आहे. या माध्यमातून भारतात सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार्यांची सर्वांना माहिती होईल अन् त्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रेरणाही मिळेल ! – संपादक
श्री. चक्रवर्ती सुलीबेले हे कर्नाटकातील प्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि प्रखर वक्ते आहेत. ते त्यांच्यातील देशप्रेम, सामाजिक जागरूकता आणि युवकांना प्रेरणा देण्याच्या कार्यामुळे कर्नाटकमध्ये ओळखले जातात. ‘युवा ब्रिगेड’ या संस्थेच्या माध्यमातून ते गेल्या १० वर्षांपासून कार्य करत आहेत.

१. ‘युवा ब्रिगेड’ संघटनेची स्थापना
अ. श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांनी ‘युवा ब्रिगेड’ ही संघटना स्थापन केली आहे. या माध्यमातून ते युवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक जागरूकता आणि सेवाभाव निर्माण करत आहेत. सहस्रो युवक या संघटनेत सहभागी होऊन राष्ट्रसेवेचे कार्य करत आहेत. या संघटनेने नद्यांचे पुनरुज्जीवन, प्राचीन मंदिरे आणि कुंडांची स्वच्छता, रक्तदान शिबिरे अन् ग्रामविकास योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. त्यांनी ‘नवभारत निर्माण अभियान’ चालू करून देशभरातील युवकांना प्रेरणा दिली आहे.
आ. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या शिकवणींवर आधारित अनेक भाषणे दिली आहेत. ते युवकांना राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन करत असतात.
इ. युवकांना उद्योजकतेचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘फिफ्थ पिलर’ या नावाने कार्यक्रम राबवला जात आहे. यासाठी युवकांसाठी ‘उद्योजकता परिषद’ आयोजित केली जात आहे.
२. सामाजिक माध्यमांद्वारे जागरूकता
श्री. चक्रवर्ती सुलीबेले हे विविध सामाजिक माध्यमांद्वारे सक्रीय असून ते राष्ट्र आणि हिंदु धर्म विषयक विचार लोकांपर्यंत पोचवतात. सामाजिक माध्यमांवरील त्यांच्या लिखाणामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत.
३. ते विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये हिंदुत्वाच्या बाजूने प्रखर भूमिका घेतात. हिंदु विरोधकांच्या कारस्थानांचा त्यांनी उघडपणे पर्दाफाश केला आहे.
४. श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांना मिळालेले पुरस्कार
अ. ‘युवा ब्रिगेड’च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन कर्नाटक सरकारने त्यांना २०२२ मध्ये ‘राज्योत्सव पुरस्कार’ दिला.
आ. मैसुरूच्या ‘सावरकर प्रतिष्ठान’कडून ‘वीर सावरकर सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
इ. ‘युवा ब्रिगेड’च्या विविध सामाजिक कार्यांचा सन्मान म्हणून वर्ष २०१८ मध्ये देहलीतील ’चाणक्य वार्ता’ या संस्थेकडून त्यांना ‘चाणक्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
५. पंतप्रधान मोदी यांच्याकडून युवा ब्रिगेडच्या कार्याची प्रशंसा
श्रीरंगपट्टणमधील ७०० वर्षे जुन्या वीरभद्रेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २ मासांत पूर्ण केला. डिसेंबर २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या रेडिओवरून प्रसारित होणार्या कार्यक्रमात वीरभद्रस्वामी मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी ‘युवा ब्रिगेड’च्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये प्रजासत्ताकदिनाच्या संचालनामध्ये युवा ब्रिगेडच्या २ कार्यकर्त्यांना विशेष निमंत्रण मिळाले.
६. ‘युवा शक्ती’चे योगदान
श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा ब्रिगेडने देशभरात समाज आणि धर्म जागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव निर्माण केला आहे. संपूर्ण राज्यात शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आहे. अनेक देवळाजवळील पाण्याचे कुंड आणि अनेक नद्यांची स्वच्छता केली आहे. युवा ब्रिगेडचे युवक नवीन पिढीला धर्माशी जोडण्याचा आणि ‘विश्वगुरु भारत’ या ध्येयासाठी ‘युवा ब्रिगेड’ स्वतःचे योगदान देत आहे.
७. ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’विरोधी जागृती अभियान
भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो महिला राष्ट्रजागृतीचे कार्य करत आहेत. त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या भीषणतेवर अनेक जिल्ह्यांमध्ये जागृती अभियान राबवले आहे. मुलांना आणि महिलांना सणांचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे.
८. ‘अमृत कुंभ’ विभाग
या विभागाच्या माध्यमातून बुद्ध, बसव, डॉ. आंबेडकर आणि वीर सावरकर यांसारख्या महान व्यक्तींचे विचार लोकांपर्यंत पोचवले जात आहेत.
९. लेखन आणि प्रकाशन कार्य
चक्रवर्ती सुलीबेले यांनी राष्ट्र आणि हिंदु धर्मविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘राईट फॅक्ट’ मालिकेद्वारे ते प्रतिमाह एक पुस्तक प्रकाशित करतात. त्यांचे विविध विषयांवरील लेख नियमितपणे दैनिक ‘विजयवाणी’ आणि ‘होस दिगंत’ यांसारख्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होतात. ते युवा लेखकांना मार्गदर्शनही करतात.
१०. स्वराज्य अभियान आणि मंदिर पुनरुज्जीवन
अ. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘स्वराज्याची ८५ वर्षे – मुक्कालु नूर’ या उपक्रमांतर्गत त्यांनी ७५ प्राचीन मंदिरे स्वच्छ करण्याचा संकल्प केला होता. ‘युवा ब्रिगेड’ने कर्नाटकमधील १५० हून अधिक मंदिरे एका दिवसात स्वच्छ केली.
आ. गोसाई घाटावरील श्रीराममंदिर जीर्ण अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांच्या विनंतीनुसार ‘युवा ब्रिगेड’ने त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिरात श्रीरामासह बिभीषण आणि शबरी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
युवकांना राष्ट्र-धर्म कार्यात जोडून कृतीशील करण्यासाठी ‘युवा ब्रिगेड’कडून राबवण्यात आले विविध उपक्रम !
१. युवकांकडून २५० मंदिरांतील जलाशय किंवा तळे स्वच्छ करण्यात आली !
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘जे पुष्कळ युवकांना आकर्षित करते, असे राष्ट्रप्रेम हे एक मोठे माध्यम आहे.’ या अनुषंगाने आम्ही एका कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याचे नाव होते ‘जागो भारत’. त्यामध्ये आम्ही गायन करणारे आणि व्याख्यान देणारे यांना एकत्र करून एक कार्यक्रम कर्नाटकातील प्रत्येक महाविद्यालयात केला. याचा परिणाम असा झाला की, महाविद्यालयात तो कार्यक्रम पाहिल्यानंतर पुष्कळ युवक आमच्याकडे येऊ लागले. या युवकांना अशा कार्यात जोडून घेतले, ज्याचा आधार धर्म असेल. अशा युवकांकडून कर्नाटकातील २५० मंदिरांतील जलाशय किंवा तळे स्वच्छ करण्याचे कार्य करून घेतले.
२. कर्नाटकातील १० नद्यांची ‘जलजीवन’ मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली स्वच्छता !

दुसर्या टप्प्यात आम्ही नद्यांची स्वच्छता केली. त्या कार्याला ‘जलजीवन’ असे नाव दिले. आम्ही संपूर्ण कर्नाटकात अशा १० नद्यांची स्वच्छता केली. प्रथम आमचे कार्यकर्ते तेथे जायचे आणि स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांचे साहाय्य घेत होते.
आमचे कार्यकर्ते नदीत उतरून तेथे लोकांनी टाकलेला कचरा गोळा करून बाहेर फेकत होते. हे कार्य पाहून तेथील स्थानिक युवक यायचे. ते आमचे कार्य पाहिल्यानंतर म्हणायचे, ‘‘आम्ही प्रतिवर्षी ही नदी स्वच्छ करण्याचे कार्य करणार.’’ अशा प्रकारे ‘आपण युवकांनी एकत्रित येऊन ती नदी स्वच्छ ठेवायची’, अशी एक भावना त्यांच्या मनात जागृत झाली. आम्ही केवळ नदीची स्वच्छता करून परत येत नव्हतो, तर नदीची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर आम्ही तेथे नदीची आरती करत होतो. ही आरती करतांना आम्ही सांगितले, ‘‘अशीच गंगा आरती काशीमध्ये होते, हे तुम्ही पाहिले असेल. आपल्या मैसुरूच्या जवळ असलेल्या नंजनगुडूमध्ये आम्ही प्रतिवर्षी ‘कपिला आरती’ करत आहोत.’’ तेथील स्थानिक कार्यकर्ते जे पूर्वी आमच्याशी जोडलेले नव्हते, तेच आता हे सर्व कार्य स्वतःहून करत आहेत आणि तेच स्वयंस्फूर्तीने तेथील मंदिर अन् नदी स्वच्छ करतात. त्यानंतर प्रतिवर्षी अशी आरती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे कर्नाटकमध्ये ५ हून अधिक नद्यांची प्रतिवर्षी स्वच्छता केली जाते आणि प्रतिवर्षी अशीच आरती करण्यात येते, हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३. मंदिरांची स्वच्छता करणे
बरेच जण म्हणतात, ‘‘अमुक मंदिर अस्वच्छ आहे, तेथे परिसरात पुष्कळ घाण आहे.’’ त्यानंतर आम्ही तेथे जाऊन ते मंदिर संपूर्णपणे स्वच्छ करून तेथील कार्यकर्त्यांच्या हाती मंदिर सोपवून सांगत होतो, ‘‘आता येथून पुढे तुम्ही हे मंदिर नेहमी स्वच्छ राखायचे आहे. जो कुणी सांगेल की, हिंदु लोक मंदिरात स्वच्छता राखत नाहीत. त्यांना दाखवूया की, आमची मंदिरे स्वच्छ आहेत. आम्हाला नावे ठेवू नका.’’ अशा प्रकारे मंदिर स्वच्छतेमध्ये आम्ही युवकांना सहभागी करून घेतल्यावर ते सर्व युवक आणि मंदिरात काम करणारे कर्मचारी आमच्याशी जोडले गेले. नवीन युवक मंदिर स्वच्छतेच्या माध्यमातून आमच्याकडे आले.
४. ‘विवेक ज्योती यात्रा अभियाना’च्या माध्यमातून जातीभेद मिटवण्याचा आणि ‘पदयात्रा अभियाना’च्या माध्यमातून धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न
पुढे आम्ही असा विचार केला की, जातीभेदाची शृंखला तोडायची असेल, तर काही कार्यक्रम पुष्कळ मोठ्या प्रमाणात केले पाहिजेत. त्यानंतर जे जे कार्यकर्ते आम्हाला मिळाले त्यांना सर्वांना घेऊन आम्ही कर्नाटकमध्ये एक पदयात्रा काढली. आपापल्या जिल्ह्यात जेथे जेथे धर्मांतर केले जाते, त्या गावात कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होतात. आम्ही धर्मांतर झालेल्या नवीन लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागलो. त्यांना विश्वास देत होतो, ‘तुम्ही अजूनही हिंदूच आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही स्वतः धर्मांतर करू नका.’
आता आपल्याला जे आपल्यासोबत आहेत त्यांना धरून ठेवायचे आहे, यासाठी आम्ही ‘पदयात्रा अभियान’ आरंभ केले. आम्ही ‘विवेक ज्योती यात्रा अभियान’ म्हणून ‘मागासलेल्या जाती’च्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्यासह सहभोजनाला बसत होतो. त्यांच्यासमवेत भोजन करणे, भजन म्हणणे, अशा प्रकारे त्यांच्याशी मिळून मिसळून कार्यक्रम करू लागलो. असे कार्यक्रम आम्ही पुष्कळ ठिकाणी केले.
५. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात करण्यात येत असलेले कार्य
या पुढे आम्ही ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात काहीतरी कार्य करूया’, असा विचार केला. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आम्ही भित्तीपत्रके बनवली आहेत. आम्ही पुष्कळ हिंदु तरुणींना प्रशिक्षण दिले आणि प्रत्येक ठिकाणी जेथेही कोणताही कार्यक्रम होत असेल, तेथे ‘लव्ह जिहाद’च्या अनुषंगाने प्रबोधन करण्यासाठी एक प्रदर्शन लावण्यात येते. प्रशिक्षित झालेल्या तरुणी या प्रदर्शनाला येणार्या महिला, मुली आणि जे कुणी पुरुष तेथे यायचे, त्यांना ‘भारतात लव्ह जिहाद कशा प्रकारे चालला आहे ? आपण त्यापासून कसे दूर राहिले पाहिजे ? स्वतःचे रक्षण कसे केले पाहिजे ?’, याविषयी सांगून प्रबोधन केले जात आहे.