अक्कलकोट येथील तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या भूमीचे अधिग्रहण लवकरच ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासासाठीच्या भूमीचे अधिग्रहण ठराव अक्कलकोट नगर परिषदेने ३० जानेवारी २०२५ या दिवशी पारित केले आहेत. सदर आरक्षण फेरपालटाच्या प्रस्तावाची छाननी नगर रचना, संचालक पुणे यांच्या स्तरावर चालू आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. शिवसेनेच्या आमदार श्रीमती उमा खापरे यांनी याविषयी तारांकित प्रश्न मांडला होता. त्याला शिंदे यांनी वरील लेखी स्वरूपात उत्तर दिले.

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी साहाय्य – माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, नगरविकास

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासन सर्वतोपरी साहाय्य करेल आणि हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती राज्यमंत्री सौ. माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य उमा खापरे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

मंत्री सौ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी ३६८ कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यात वाहनतळ, तलाव सुशोभिकरण, भक्तनिवास, शौचालये, पोलीस नियंत्रण कक्ष आणि अन्य मूलभूत सुविधांचा समावेश आहे. येथील ९ प्रमुख रस्त्यांच्या विकासावर भर देण्यात आला असून त्यापैकी ४ रस्त्यांचे काम चालू आहे, तर उर्वरित ५ रस्ते भू-संपादनाच्या टप्प्यात आहेत. या विकास आराखड्यातील आरक्षित जागेचे भूसंपादन देवस्थानाने करायचे होते; मात्र १० वर्षांपासून त्यांनी भूसंपादन केले नसल्याने नगरपरिषदेने भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवला आहे.

अक्कलकोट नगर परिषद विकास योजनेला वर्ष २०११ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर गेली १० वर्षे होऊनसुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. प्रस्तावित आराखड्यांमध्ये एकूण ९ रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ रस्त्यांची कामे सध्या चालू आहेत. उर्वरित रस्त्यांच्या भूसंपादन आणि विकासकामांसाठी नगर परिषदेकडून सुधारित आराखडा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

‘अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स २३ मे २०२३ मध्ये झालेल्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये ३६८ कोटी ७१ लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.