देहली, फरीदाबाद आणि नोएडा येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद !

फरीदाबाद येथील ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू

देहली – सनातन संस्थेच्या वतीने देहली, फरीदाबाद आणि नोएडा येथील ९ मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. नवी देहली येथे ग्रेटर कैलास भाग-२ येथील सनातन धर्म मंदिर, मालवीयनगरमधील लक्ष्मी नारायण मंदिर, कालकाजी येथील लक्ष्मी नारायण मंदिर, गुरुग्राममधील श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. हरियाणातील फरीदाबादच्या सेक्टर-२१ मधील समन्वय मंदिर, सेक्टर २९ येथील सनातन धर्म मंदिर आणि सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर येथे प्रदर्शन लावण्यात आले होते. यासमवेतच नोएडातील सेक्टर ५६ येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि सेक्टर ४७ मधील श्री शिवशक्ती मंदिर येथेही ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या सर्व ठिकाणी भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

वैशिष्ट्यपूर्ण : फरीदाबादमधील समन्वय मंदिराचे प्रमुख श्री. महेश यांनी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवणे, तसेच मंदिर परिसरात उदबत्ती आणि दिवे लावणे यांसारख्या सेवा केल्या. ‘भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करावे’, असे त्यांनी सांगितले.


वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे :

१. फरीदाबादमधील सेक्टर २९ येथील सनातन धर्म मंदिरात लावलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भाविकांना शिवलिंगाला प्रदक्षिणा घालण्याची आणि बेलाची पाने अर्पण करण्याची शास्त्रानुसार पद्धत सांगण्यात आली. यासमवेतच रांगेत उभ्या असलेल्या भाविकांकडून सामूहिकपणे ‘ॐ नमः शिवाय’ हा नामजप भावपूर्ण करून घेण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.

२. सर्व ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यास तेथील मंदिर समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. त्यांनी प्रदर्शन लावण्यासाठी पटल आणि आसंद्या (खुर्च्या) उपलब्ध करून दिल्या.