
सांगली, १ मार्च (वार्ता.) – सांगली येथील श्रीराम मंदिर चौक सुशोभिकरणाविषयी जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केला आहे.
अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या की, अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकारल्यानंतर मी नगरसेविका म्हणून जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार्या निधीतून येथील श्रीराममंदिराच्या समोर सुशोभिकरण आणि अयोध्येतील श्रीराममंदिराची प्रतिकृती उभारणे अशा कामांना मान्यता मिळवली होती. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने या कामास प्रशासकीय मान्यताही प्रदान केली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने या कामाची निविदा प्रसिद्ध करून या कामास कार्यारंभ आदेशही दिलेला आहे. कार्यारंभ आदेशाप्रमाणे ठेकेदाराने श्रीराममंदिर चौक सुशोभिकरणाचे काम चालू केल्यानंतर पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेकडे या कामाविषयी हरकत घेणारे पत्र दिल्याने हे काम सध्या बंद आहे. हा विषय जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला होता; मात्र प्रशासनाने पालकमंत्र्यांचीही या प्रकरणामध्ये दिशाभूल केली आहे.
त्या म्हणाल्या की, येथील श्रीराममंदिराच्या समोर सुशोभिकरण करून अयोध्येतील श्रीराममंदिराची प्रतीकृती उभारून त्यावर प्रभु श्री रामचंद्र यांचा भगवा ध्वज लावण्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत; परंतु प्रशासन जाणीवपूर्वक या कामामध्ये तेढ निर्माण करत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हे काम थांबले आहे. याविषयी पाठपुरावा करून श्रीराममंदिर चौकाचे सुशोभिकरण आणि श्रीराममंदिराची प्रतीकृती उभारण्याचे काम आम्ही पूर्ण करून घेऊ.