
इंदापूर (पुणे) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ फेब्रुवारीला महसूल साहाय्यक महिलेला लाच स्वीकारतांना अटक करून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल, अशी शिक्षा दिल्याविना लाचखोरी संपुष्टात येणार नाही. – संपादक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांची इंदापूर तालुक्यात ३९ गुंठे भूमी आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याविषयी वर्ष २०२० पासून तहसीलदारांकडे दावा चालू होता. इंदापूर तहसीलदारांची सुनावणी होऊन निकाल देण्याची प्रक्रिया शेष होती.
निकालाची कागदपत्रे तक्रारदारांच्या बाजूने सिद्ध करून देण्यासाठी कावेरी खाडे यांनी ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ सहस्र रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदार शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.