‘श्री व्यंकटेश्वर स्वामी, म्हणजे तिरुपती बालाजी माझ्यासाठी सर्वकाही आहेत’, असे मला वाटायचे. मला त्यांचे दर्शन घेण्याची पुष्कळ ओढ लागली होती. ‘त्या मंदिरात केवळ मूर्ती नसून साक्षात् भगवंत आहे’, याविषयी मी पुष्कळ गोष्टी ऐकल्या होत्या. ‘माझे सर्वस्व मला तिथे डोळ्यांनी पहायला मिळणार आहे’, असे वाटून आम्ही (मी आणि माझे आई-बाबा यांनी) तेथे जाण्याचे ठरवले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. विमानाने प्रवास करतांना श्री आकाशदेवाचे दर्शन होणे आणि मेघांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्तुती करणे
आम्ही तिरुपती येथे जाण्यासाठी विमानाने प्रवास करतांना तिरुपतीच्या जवळ आल्यावर मला सूक्ष्मातून श्री आकाशदेवाचे दर्शन झाले. त्याने आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि त्याच्या हातात सुवर्णासम लखलखणारे काहीतरी होते. नंतर आकाशातील शुभ्र मेघ मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘आम्हाला सच्चिदानंद गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) पुष्कळ आठवण येते. आमच्यासाठी तेच तिरुपती बालाजी आहेत.’ त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.

२. ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’च्या विष्णुनिवासम् नावाच्या वास्तूत चैतन्य आणि विष्णुतत्त्व अनुभवणे
आम्ही ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’च्या भक्तनिवासात, म्हणजेच ‘विष्णुनिवासम्’ नावाच्या इमारतीत राहिलो. तिथे मला पुष्कळ चैतन्य आणि विष्णुतत्त्व जाणवले. तिथे पुष्कळ गर्दी होती, तरीही मला तेथील वातावरणात दाब जाणवला नाही. त्यानंतर आम्ही तिरुपती गावातील अन्य चांगल्या पथिकनिवासात (हॉटेलमध्ये) राहिलो; मात्र तिथे मला काही प्रमाणात दाब जाणवला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘विष्णुनिवासम् या वास्तूत विष्णूचा निवास आहे आणि तेथील प्रत्येक खोलीत ‘तिरुपती बालाजी आणि पद्मावती अम्मावरी’ यांची चित्रे आहेत. त्यामुळे तिथे पुष्कळ चैतन्य होते.’
३. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतांना अवर्णनीय चैतन्य अनुभवणे आणि दर्शन झाल्यावर ‘डोळ्याचे पारणे फिटले’, असे वाटणे
तिरुपतीचे दर्शन घेण्यापूर्वी ‘आम्ही नारायणाला प्रत्यक्ष भेटणार’, असेच आम्हाला वाटत होते. आमची प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाला जाण्यापूर्वी जशी मनाची स्थिती असते, तशीच स्थिती आता होती. आम्हाला बालाजीच्या मंदिरात ३ घंटे रांगेत उभे रहावे लागले. तेव्हा माझी भगवंताच्या भेटीची ओढ आणि तळमळ वाढत गेली. तेथे मला अवर्णनीय चैतन्य जाणवत होते. ‘हा पृथ्वीलोक नाही’, असे मला वाटत होते. तेथील मुख्य मूर्तीच्या समोरील गाभार्यात गेल्यावर मला पुष्कळ थंडावा जाणवला. तिथे वेगळेच वायुमंडल होते. तिथे लोकांची गर्दी असूनही मला कोणताच आवाज ऐकू येत नव्हता. सर्वकाही स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. भगवंताला पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्या वेळी मला निराळी प्रार्थनाही सुचली नाही. मी काही क्षण केवळ देवाकडे पाहिले. त्यातच मला सर्वकाही मिळाले.
४. ‘वैकुंठद्वारा’चे दर्शन घेतांना गुरुदेवांच्या आश्रमाची आठवण येऊन भावजागृती होणे
बालाजीचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही गर्भगृहाबाहेर आलो. तेथे ‘वैकुंठद्वार’ नामक सोन्याचे द्वार आहे. त्याचे दर्शन घेतांना ‘गुरुदेवांचा आश्रम हाच माझ्यासाठी भूवैकुंठलोक आहे. देवाच्या कृपेने या जन्मी माझी भेट श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांशी झाली’, असे मला वाटले आणि माझ्या डोळ्यांतू भावाश्रू वाहू लागले.
‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊली, आपणच स्वतः व्यंकटेशस्वरूप आहात. आपल्या अनंत कृपेमुळे मला व्यंकटेशस्वरूपात तुमचे दर्शन घेता आले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(१६.८.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |