
१. नामजप करत असतांना स्वत:ऐवजी ‘पार्वतीदेवी शिवासाठी नामजप करत आहे’, असे जाणवणे
‘२४.२.२०२५ या दिवशी मी सायंकाळी ७ ते ७.२० वाजण्याच्या सुमारास डोळे मिटून तनोटमाता मंदिराच्या समोर बसून नामजपादी उपाय करत होते. तेव्हा ‘नामजप करणे थांबवूच नये’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘मी नामजप करत नसून पार्वतीदेवी शिवासाठी नामजप करत आहे’, असे मला २ – ३ वेळा जाणवले.
२. दैवी घुबडाचे दर्शन होणे आणि हलकेपणा जाणवणे
काही वेळाने मी डोळे उघडल्यानंतर मंदिराच्या शेजारी असणार्या झाडांतून अकस्मात् एक पांढरे शुभ्र घुबड माझ्यासमोर येऊन बसले. मी त्याच्याकडे पहातच राहिले. तेव्हा मला आठवले, ‘घुबड हे लक्ष्मीदेवीचे वाहन आहे.’ मी उठून त्या दैवी घुबडाला नमस्कार केला. त्यानंतर घुबडाने काही क्षण माझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहिले आणि ते पुन्हा जिथून आले, तिथे उडून गेले. त्यानंतर मला हलकेपणा जाणवू लागला. मी यापूर्वी कधीच घुबड पाहिले नव्हते, तसेच ते आश्रमाच्या परिसरात कुणाला दिसल्याचे ऐकले नव्हते.
३. ‘सायंकाळी घुबडाचे दर्शन झाल्याने लक्ष्मीदेवीनेच तिच्या अस्तित्वाची अनुभूती दिली’, असे जाणवणे
मी श्री. कृष्णा मांडवा (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४५ वर्षे) यांना याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘एकदा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘असे दुर्मिळ पक्षी हे ऋषिमुनी किंवा साधू-संत यांचे रूप असते. ते साधकांना आशीर्वाद देण्यासाठी, तसेच तपश्चर्या किंवा ध्यान करण्यासाठी अशा दैवी पक्ष्यांच्या माध्यमातून येतात.’’ श्री. कृष्णा मांडवा यांचे बोलणे ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ‘सायंकाळच्या वेळी घुबडाचे दर्शन झाले, म्हणजे साक्षात् लक्ष्मीदेवीनेच तिच्या अस्तित्वाची अनुभूती दिली’, असे मला जाणवले.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला ही दैवी अनुभूती आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे), फोंडा, गोवा. (१.३.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |