छावा – कालचा, आजचा आणि उद्याचा…!

‘छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे पराक्रम, त्याग आणि बलीदान यांचे ज्वलंत उदाहरण आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने त्यांच्या जीवनातील प्रसंगांचे जिवंत चित्रण केले आहे. औरंगजेबाच्या अमानुष छळासमोरही छत्रपती संभाजी महाराजांनी झुकण्यास नकार दिला. त्यांचे बलीदान पाहून संपूर्ण महाराष्ट्राचा काय देशभरातील लोकांचा ऊर भरून आला.; मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, ‘मग आता पुढे काय ?’

१. कालचा छावा – छत्रपती संभाजी महाराज : शौर्य, विद्वत्ता, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा यांचे प्रतीक !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याचे रक्षण करण्याचे कार्य केले. अवघ्या ११ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्यावर आलेल्या असंख्य संकटांना धैर्याने तोंड दिले. त्यांनी मोगलांशी, तसेच पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशीही प्रभावी लढा दिला. औरंगजेबाने त्यांना कैद करून इस्लाम स्वीकारण्याचा दुराग्रह केला; परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा धर्म आणि स्वाभिमान टिकवून ठेवत अत्यंत अमानुष छळ सहन केला अन् शेवटी बलीदान दिले. त्यामुळे त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली जाते.

छत्रपती संभाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर उत्तम कवी, विद्वान, संघटक आणि कुशल प्रशासक होते. त्यांना संस्कृत, मराठी, फारसी, कन्नड इत्यादी भाषा अवगत होत्या. त्यांनी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्य अबाधित ठेवले आणि हिंदवी स्वराज्याची पताका उंच ठेवली.

श्री. अमोल बधाले

२. आजचा छावा – आजचा तरुण : संस्कार, त्याग, नीतीमत्ता आणि धर्मनिष्ठता यांची आवश्यकता !

आजच्या तरुण पिढीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे गुण कितपत आहेत ? त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; पण त्यांच्या विचारांचे अनुकरण करणारे खरच किती जण आहेत ?

अ. देशाच्या विकासात तरुणांचा सहभाग दिसतो; पण त्यांच्यात राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान दिसून येत नाही.

आ. आजच्या समाजात अन्याय, भ्रष्टाचार आणि अधर्म वाढत आहे; पण त्याविरुद्ध उभे रहाणारे उणेपुरेच आहेत.

इ. ‘धर्मरक्षण करणे, हे तितकेच आवश्यक आहे’, हे लक्षात घेणारे किती आहेत ?

छत्रपती संभाजी महाराजांनी संकटांचा सामना करून धर्म आणि स्वराज्य टिकवले. असे आहे, तर मग आजचा तरुण स्वधर्माची होत असलेली हानी पाहून गप्प का बसतो ? केवळ इतिहास ऐकायचा कि त्याचा आदर्श घेऊन पुढे जायचे ?

आजचा तरुण खरेच छावा बनू शकतो का ? : त्यासाठी त्याला त्याग, कष्ट आणि धर्माभिमान या तत्त्वांचा स्वीकार करावा लागेल. संस्कार, नैतिकता आणि धर्मनिष्ठा यांच्या माध्यमातूनच सक्षम राष्ट्र उभे राहू शकते !

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पण केले; पण धर्म आणि संस्कृती यांच्याशी तडजोड केली नाही. आजच्या पिढीनेही हिंदु संस्कृती आणि परंपरा यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. धर्म, म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर त्यातील संस्कार, नीतीमूल्ये यांचे आचरण, धर्मव्यवस्था आणि आपली कुटुंबव्यवस्था टिकवणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

३. उद्याचा छावा : पुढच्या पिढीसाठी प्रेरणा, संस्कार आणि धर्मसंरक्षण !

जर आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आत्मसात् केले, तर उद्याची पिढी आपोआप सक्षम घडेल.

उद्याचा छावा, म्हणजे ती पिढी जी सत्य, धैर्य, न्याय आणि धर्मसंरक्षण यासाठी लढेल !

पूर्वी घरातूनच नम्रता, सत्यप्रियता, धर्मनिष्ठा आणि कर्तव्यपरायणता हे संस्कार दिले जात असत. आज हे संस्कार दुर्लक्षित होत आहेत, त्यामुळे उद्याची पिढी योग्य दिशेने जाणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराज केवळ योद्धे नव्हते, ते संस्कारक्षम राजा होते; म्हणूनच उद्याच्या छाव्यातही संस्कार आणि धर्मसंरक्षणाचे बळ असणे आवश्यक आहे.

जो तरुण कुटुंब, समाज, धर्म आणि राष्ट्र यांसाठी उत्तरदायित्वाने कार्य करील, उत्तम संस्कार अंगीकारेल अन् आपल्या धर्मसंस्कृतीचे रक्षण करील, तोच खरा छावा ठरेल !

४. सारांश : केवळ इतिहास नाही, तर एक प्रेरणा !

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे. स्वतः छावासमान गुण आचरणात आणून संस्कार, धर्मसंरक्षण आणि पराक्रम यांसाठी नवा छावा घडवणे, हे आजच्या तरुणाचे उत्तरदायित्व आहे !

– श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०२५)

खर्‍या अर्थाने छावा निर्माण करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समिती ही हिंदूंमध्ये धर्मजागृती, संस्कार निर्माण करणे आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करणारी संघटना आहे. 

धर्मशिक्षण : हिंदु धर्माचे खरे ज्ञान आणि सुसंस्कार यांचा प्रचार.

संस्कार निर्मिती : युवा पिढीमध्ये नैतिक आणि राष्ट्रनिष्ठ मूल्ये रुजवणे.

धर्मरक्षण : मंदिर, संस्कृती आणि धर्मगौरव टिकवण्यासाठी प्रयत्न.

स्वसंरक्षण प्रशिक्षण : आत्मरक्षण आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी.

साधना आणि आत्मविकास : धर्मरक्षणासह स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी समाजाला साधना शिकवणे.

संपर्क : ७७३८२३३३३३

जर तुम्हाला राष्ट्र आणि धर्म यांच्या सेवेसाठी कार्य करायचे असेल आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती करायची असेल, तर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी व्हा अन् खर्‍या अर्थाने ‘छावा’ व्हा !