नियमित नामस्मरण करतांना या १० गोष्टी कटाक्षाने टाळा !

‘पद्म पुराणा’त १० ‘नाम अपराध’ वर्णन केले आहेत. नामस्मरण करणार्‍यांनी आपल्याकडून ते घडू नयेत; म्हणून सजग असणे आवश्यक आहे.

वैद्य परीक्षित शेवडे

१. सन्निन्दा : इतर भगवद्भक्तांची किंवा सज्जनांची निंदा करणे.

२. असति नामवैभवकथा : ज्यांना भक्तीभाव / श्रद्धा नाही किंवा जे नास्तिक आहेत, त्यांच्यासमोर नामस्मरणाचे गुणगान करणे.

३. श्रीशेशयोर्भेदधी: । : शिव आणि विष्णु हे भिन्न आहेत, असे मानणे.

उभयो: प्रकृतिस्त्वेका प्रत्ययभेदेन भिन्नवद्भाति।
कलयति कश्चिन्मूढो हरिहरभेदं विना शास्त्रम् ॥

अर्थ : हरि आणि हर यांची प्रकृती एकच असून प्रत्ययभेदाने ते भिन्न भासतात. ही सत्यस्थिती न जाणणारे मूर्ख मात्र हरि-हर भेद करत रहातात.

४ ते ६. अश्रद्धा श्रुतिशास्त्रदैशिकगिराम् ।

अर्थ : श्रुति म्हणजेच वेद, शास्त्र म्हणजेच अन्य सर्व धर्मग्रंथ आणि गुरु यांच्या वचनांचा अनादर करणे.

७. नाम्र्यर्थवादभ्रम: । : म्हणजे नामस्मरणाविषयी फारच वाढून चढवून सांगितले जाते आणि प्रत्यक्षात इतक्या सोप्या गोष्टीने कसा काय लाभ होईल ?, अशी शंका घेणे.

८ आणि ९. नामास्तीति निषिद्धवृत्तिविहितत्यागौ ।

अर्थ : एकीकडे नामस्मरण करत दुसरीकडे पापकर्म करत रहाणे किंवा नामस्मरण केल्यानेच सारे काही होईल, अशा मानसिकतेत जाऊन विहित कर्मांचा त्याग करणे.

१०. धर्मान्तरै: साम्यम् ।

अर्थ : ‘नामस्मरण करा वा करू नका; आपले कर्म नीट करत रहा. तेही पुरेसे आहे’, अशी धारणा ठेवत नामाच्या महतीला नाकारणे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२१.२.२०२५)