America Stopped Aid To Bangladesh : अमेरिकेकडून बांगलादेशाला देण्यात येणार्‍या साहाय्यावर बंदी

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेकडून अन्य देशांना देण्यात येणारे साहाय्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बांगलादेशाचाही समावेश आहे. अमेरिकेने इस्रायल, इजिप्त वगळता सर्व देशांचे साहाय्य बंद केले आहे. यात गरीब देशांना देण्यात येणार्‍या आरोग्य साहाय्याचाही समावेश आहे.

या निर्णयानंतर ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ने  बांगलादेशातील सर्व प्रकल्प बंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. यात म्हटले आहे की, बांगलादेश करारांतर्गत दिलेले कोणतेही अनुदान, सहकारी करार किंवा इतर साहाय्य तात्काळ थांबवण्याचे किंवा बंद करण्याचे आदेश दिले जात आहेत.

बांगलादेशाची आर्थिक स्थिती होणार डळमळीत !

अमेरिकेच्या बंदीनंतर बांगलादेशाची आर्थिक स्थिती आणखी डळमळणार आहे, असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सतत वाढत जाणारी अर्थसंकल्पीय तूट, घसरणारा परकीय चलन साठा, घसरणारे चलन मूल्य आणि वाढती उत्पन्न असमानता यांसारख्या संकटांनी बांगलादेशासाठी आधीच अडचणी निर्माण केल्या आहेत. शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर १० लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. आर्थिक संकटामुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. बांगलादेशाच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

संपादकीय भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प इतक्यावर थांबणार नाही, तर तेथील हिंदूंच्या रक्षणासाठीही पावले उचलतील, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !