Tulip Siddiq Resigns : ब्रिटनच्या अर्थमंत्री ट्युलिप सिद्दीक यांचे त्यागपत्र !

ब्रिटनच्या अर्थमंत्री ट्युलिप सिद्दीक आपले त्यागपत्र दाखवताना

लंडन – ब्रिटनच्या अर्थमंत्री आणि कामगार पक्षाच्या खासदार ट्युलिप सिद्दीक यांनी नुकतेच मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या त्या भाची आहेत. सिद्दीक यांच्यावर लंडनमधील त्यांच्या मालमत्तेविषयी पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार यांविषयी आरोप होता.

ट्युलिप सिद्दीक यांनी पंतप्रधान कीअर स्टार्मर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांनी नेहमीच अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार आणि पारदर्शकतेने काम केले आहे; पण या वादांमुळे त्यांनी मंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला. ‘शेख हसीना यांच्याशी असलेले त्यांचे संबंध हे त्यांच्या त्यागपत्राचे एक मोठे कारण होते’, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

१. ब्रिटीश पंतप्रधानांनी सिद्दीक यांचे त्यागपत्र स्वीकारले आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या विरोधात कोणत्याही आर्थिक अनियमिततेचा किंवा मंत्रीपदाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

२. कामगार पक्षाच्या खासदार एम्मा रेनॉल्ड्स यांना नवीन अर्थमंत्री बनवण्यात आले आहे.

३. शेख हसीना सध्या भारतात आहेत आणि भारताने त्यांना राजकीय आश्रय दिला आहे.