|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांताला पाकपासून स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र लढा देणार्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या संघटनेने ९ डब्यांच्या जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याला अनेक तास उलटल्यानंतरही पाकचे सैन्य रेल्वे आणि त्यातील प्रवाशांची सुटका करू शकलेले नाही. पाक सैन्याकडून रेल्वेची सुटका करण्यासाठी कारवाई केली जात आहे. सैन्याने दावा केला आहे की, आतापर्यंत १६० जणांची सुटका करण्यात आली असून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या १६ सदस्यांना ठार मारण्यात आले आहे. अशातच पाकचेही ३० सैनिक ठार झाले आहेत. या रेल्वेमध्ये ४५० जणांना ओलीस ठेवण्यात आल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते; मात्र सध्याच्या माहितीनुसार २१४ जण ओलीस आहेत. आर्मीच्या सदस्यांनी धमकी दिली आहे की, त्यांच्यावर पाकच्या सैन्याने एक जरी गोळी झाडली, तरी पाकच्या १० सैनिकांना ठार मारले जाईल.
🚨 #TrainHijack: 214+ Pak Army personnel in Jaffar Express held hostage by Balochistan Liberation Army (BLA), 6 soldiers killed—demands release of all Baloch political prisoners.
The very terrorism Pakistan fostered to wage J!h@d against India is now shaking its own foundations!… https://t.co/4AuY49HuUy pic.twitter.com/jybAhKCS0Q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 11, 2025
पाकिस्तानी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्वेटाहून पेशावरला जाणार्या जाफर एक्सप्रेसमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. ही रेल्वे बलुचिस्तानमधील बोलान येथे एका बोगद्यात घुसली, तेव्हा बलुच बंडखोरांनी त्यावर आक्रमण करून तिला कह्यात घेतले. यानंतर रेल्वेतील महिला आणि मुले अशा १८० जणांची सुटका करण्यात आली.
‘रेडिओ पाकिस्तान’च्या वृत्तानुसार पाकिस्तानी सुरक्षा दलांनी १०४ ओलिसांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये ५८ पुरुष, ३१ महिला आणि १५ लहान मुले यांचा समावेश आहे.
पाक सैन्याला कारवाई करणे कठीण !
ज्या भागात रेल्वे थांबवण्यात आली आहे, ती एक दुर्गम डोंगराळ खिंड आहे, जिथे भ्रमणभाषद्वारे संपर्क आणि संसाधने पोचणे कठीण आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करणे कठीण होत चालले आहे.
पाक सैन्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने फेटाळला
बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन प्रसारित केले असून ओलिसांच्या सुटकेविषयी पाकच्या सैन्याने केलेला दावा फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केल्यामुळे महिला आणि मुले यांना सोडण्यात आल्याचे या संघटनेने म्हटले आहे. सध्या आमच्या नियंत्रणात २१४ प्रवाशी असून यातील बहुतेक पाकच्या सुरक्षादलातील सैनिक आहेत, असे या संघटनेने म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने आक्रमण केले असले, तरी ‘आम्ही सर्व सुरक्षित आहोत’, असाही दावाही संघटनेने केला आहे.
पाकिस्तानी सैन्याने केलेले आक्रमण दायित्वशून्य कृत्य आहे. पाकचे सैन्य ओलिसांविषयी चर्चा करण्यास सिद्ध नाही, असे यावरून दिसून येते, असेही या संघटनेने म्हटले आहे.
प्रत्येक तासाला ५ ओलिसांना ठार मारण्याची धमकी
बलुच लिबरेशन आर्मीने ओलिसांच्या बदल्यात बलुचिस्तानमधील राजकीय बंदीवानांची सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आला आहे. मागणी मान्य न झाल्यास मुदत संपल्यानंतर प्रत्येक तासाला ५ ओलिसांची हत्या करण्यात येईल आणि हे चक्र शेवटपर्यंत चालू राहील, अशी चेतावणी दिली आहे. असे संघटनेने म्हटले आहे.
‘सीपीईसी’ बंद करण्याचीही मागणी !चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी, म्हणजेच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग) प्रकल्प बंद करण्याची मागणीही बलुच लिबरेशन आर्मीने ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात पाककडे केली आहे. |