सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असलेली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. स्‍वतः केलेल्‍या नृत्‍याची ध्‍वनीचित्र-चकती पहातांना साधिकेच्‍या मनाची झालेली विचारप्रक्रिया !

१ अ. ‘नृत्‍य चांगले केले’, असे वाटणे : ‘वर्ष २०१८ आणि २०१९ मध्‍ये आश्रमात होणार्‍या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या वेळी अन् अन्‍य काही कारणांच्‍या निमित्ताने मी केलेल्‍या नृत्‍याची ध्‍वनीचित्र-चकती साधकांना दाखवण्‍यात येत असे. त्‍या वेळी ती ध्‍वनीचित्र-चकती पहातांना माझ्‍या मनात ‘माझे नृत्‍य साधकांना दाखवत आहेत. मी नृत्‍य चांगले केले आहे’, असे विचार येत असत.

१ आ. ‘सर्व देवाच्‍या कृपेमुळे आणि व्‍यष्‍टी साधनेच्‍या चांगल्‍या प्रयत्नांमुळे होते’, ही जाणीव होऊन ‘अन्‍य साधिका नृत्‍य करत आहे’, असे वाटणे : वर्ष २०२१ मध्‍ये रामनाथी आश्रमात नवरात्रीनिमित्त मी केलेले कालिकास्‍तुतीवर (‘ऐगिरी नंदिनी’ या गीतावर) आधारित नृत्‍य दाखवले. तेव्‍हा ते नृत्‍य पहातांना माझ्‍या मनात ‘सर्व देवाच्‍या कृपेमुळे आणि व्‍यष्‍टी साधनेच्‍या चांगल्‍या प्रयत्नांमुळे होते’, ही जाणीव होती. मी नृत्‍य पहात असतांना ‘तिथे मी नसून अन्‍य साधिका नृत्‍य करत आहे’, असे मला वाटत होते.

कु. अपाला औंधकर

१ इ. ‘साक्षात् श्री दुर्गादेवी तिथे अवतरली होती. मी काय नृत्‍य करू शकते ? ते नृत्‍य केवळ देवी आणि गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांनी माझ्‍याकडून करून घेतले’, याची मला जाणीव झाली.

१ ई. ‘देवामुळे प्रत्‍येक कृती घडते’, ही जाणीव मनात असतांना खरा आनंद मिळणे : ‘आपल्‍यामध्‍ये ‘मीपणा’ असतो, त्‍या वेळी आपण कोणताच आनंद घेऊ शकत नाही. ‘देवामुळे प्रत्‍येक कृती घडते’, ही जाणीव मनात असल्‍यावर अहं वाढत नाही आणि खरा आनंद मिळतो’, हे गुरुदेवांनी मला या प्रसंगांच्‍या माध्‍यमातून शिकवले.

‘हे गुरुदेवा, तुम्‍हीच माझ्‍यामधील अहं दूर करा. माझ्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित अशी नृत्‍यसाधना होण्‍यासाठी तुमची माझ्‍यावर कृपादृष्‍टी असू दे’, अशी मी आपल्‍या कोमल चरणी प्रार्थना करते.’

२. स्‍वतःचे कौतुक झाल्‍यावर मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि शिकायला मिळालेले सूत्र !

२ अ. साधकांनी नृत्‍याची प्रशंसा केल्‍यावर मनाला प्रश्‍न विचारून शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाण्‍याची जाणीव होणे : मी केलेल्‍या नृत्‍याची ध्‍वनीचित्र-चकती पाहून अनेक साधक मला भेटल्‍यावर ‘नृत्‍य भावपूर्ण केले आहे. साक्षात् दुर्गादेवीच नृत्‍य करत आहे’, असे वाटत होते’, अशी माझी प्रशंसा करायचे. त्‍या वेळी मी स्‍वतःलाच प्रश्‍न विचारू लागले, ‘अपाला, तू शिकण्‍याच्‍या स्‍थितीत आहेस ना ? गुरुदेवांना अपेक्षित असे तुझे वागणे होत आहे ना ?’ त्‍या वेळी त्‍वरित मी भानावर येत असे. मला ‘साधक माझे कौतुक करत आहेत’, असे वाटत नसे.

२ आ. ‘कौतुक’ हे केवळ भगवंताच्‍या गुणांचेच होऊ शकते’, असा मनात विचार येऊन सर्व देवाच्‍या चरणी अर्पण करणे : यानंतर मी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगितले, ‘गुरुदेवा, मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत आहे, तर मला तुम्‍ही निश्‍चितच काहीतरी सांगाल आणि मी माझ्‍या कौतुकात अडकले असेन, तर तुम्‍ही मला काही सांगणार नाही.’ तेव्‍हा मला गुरुदेवांनी सुचवले, ‘कौतुक’ हे केवळ भगवंताच्‍या गुणांचेच होऊ शकते. भगवंताच्‍याच कृपेमुळे त्‍यातील एका गुणाचे कौतुक झाले, तर यात माझे काही नाही.’ तेव्‍हा मी देवाच्‍या चरणी सर्व अर्पण केले.

३. आश्रमातील वस्‍तूंकडून शिकायला मिळालेले सूत्र  

अ.  एकदा मी आश्रमातील पंखा, आसंदी, खिडकी आणि खिडकीला लावलेली जाळी, पेला, भांडी, ताटे यांच्‍याकडे पाहिल्‍यावर ‘ते पुष्‍कळ आनंद व्‍यक्‍त करत आहेत’, असे मला जाणवले.

आ. याचे चिंतन केल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘त्‍या वस्‍तू वैकुंठातील आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात जिवंतपणा आहे. त्‍यांच्‍याही मनात गुरुदेवांप्रती अपार भाव आहे.’

इ. ‘निर्जीव वस्‍तू वैकुंठात राहून इतका आनंद घेतात, तर मीही प्रत्‍येक क्षणी वैकुंठात रहात असल्‍याची जाणीव माझ्‍या मनाला सतत द्यायला हवी. तो आनंद आणि कृतज्ञताभाव माझ्‍या मनात अखंड रहायला हवा’, हे देवाने मला शिकवले.’

– कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय१७ वर्षे) फोंडा, गोवा. (१८.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक