
पुणे, ५ मार्च (वार्ता.) – ब्रिटीश राजवटीला मुख्य ३ प्रवाहांपासून धोका होता – क्रांतीकारक, युरोपमधील संघर्ष आणि भारतीय सैन्यात बंडाची भावना. या सर्व प्रवाहांना गती देण्याचे कार्य स्वा. सावरकर यांनी केले. काँग्रेसचा फारसा त्रास ब्रिटिशांना नव्हता, कारण वर्ष १८५७ सारखी विरोधी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ब्रिटिशांना सोयीस्करच पडेल अशा काँग्रेसची निर्मिती करण्यात आली होती. काँग्रेसची राजवट ही साम्यवाद आणि समाजवाद यांनी प्रेरित असल्याने, त्याला थेट विरोध करणारा विचार हा हिंदुत्वाचा होता. स्वा. सावरकर हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते, त्यामुळे काँग्रेस राजवटीला स्वा. सावरकर यांचा राग होता, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले. सावरकर विचार मंच, लखनौ यांच्या वतीने वैद्य श्री. अजय दत्त शर्मा, तसेच ‘रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट’ यांनी टिळक रस्ता (पुणे) येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे ‘स्वा. सावरकर – विचार, आक्षेप आणि वास्तव’ हा परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक श्री. अक्षय जोग हे ही उपस्थित होते. परिसंवादाच्या माध्यमातून दोघांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे देत सावरकर यांच्याविषयी असलेल्या आक्षेपांचे खंडण केले. ‘भारतरत्न’ देण्याविषयी विचारल्यावर अभिजित जोग म्हणाले की, स्वतः नेहरू, इंदिरा गांधी यांनी स्वतःला ‘भारतरत्न’ दिला. सावरकर यांनी अनेक पैलूंचे श्रेष्ठत्व आहे, त्या प्रत्येक पैलूला ‘भारतरत्न’ दिले जाऊ शकते. त्यामुळे सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तीला ‘भारतरत्न’ देऊ नये, असे मला वाटते.
सावरकरांचे लेखन पू. हेडगेवार यांनाही भावले ! – अक्षय जोग, इतिहास अभ्यासकसावरकर यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आणि जोसेफ मॅझिनीचे आत्मचरित्र या २ पुस्तकांवर ब्रिटिशांनी बंदी घातली. सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या पुस्तकात लिहलेली प्रस्तावना पुष्कळ जहाल होती. सावरकरांचे ‘हिंदुत्व’ पुस्तक रत्नागिरी कारागृहात त्यांनी लिहिले. नागपूर येथे त्यांचे मावस भाऊ विश्वनाथ केळकर यांनी ते प्रकाशित केले. त्यांचे सहकारी, पू. हेडगेवार यांनी ते पुस्तक वाचल्यानंतर सावरकरांचे लेखन त्यांना इतके भावले की, त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात पुस्तकाची विनामूल्य जाहिरात केली. स्वामी श्रद्धानंद म्हणतात, या पुस्तकाच्या लेखकाला हे लिहिणे त्या वेळी स्फुरले असावे, ज्या वेळी ऋषीमुनींना वेद स्फुरले असावेत. |
याविषयी सांगतांना इतिहास अभ्यासक अक्षय जोग म्हणाले की, साहित्याचे ‘नोबेल’ पारितोषिक मिळालेले लेखक चर्चिल स्वा. सावरकर यांचे लिखाण वाचून त्यांचे कौतुक करतात. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याऐवजी भारतातील एखादे क्षेपणास्त्र, रणगाडा अथवा घातक शस्त्र याला सावरकर यांचे नाव द्यावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कार्यक्रमाचा शेवट स्वा. सावरकर यांनी लिहिलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताचे गायन करून झाला. कार्यक्रमाचा समन्वय श्री. प्रसाद ठोसर यांनी केला.
श्री. अभिजित जोग पुढे म्हणाले की,
१. ‘आझाद हिंद सेने’चे संस्थापक रासबिहारी बोस यांनी सांगितले होते की, नव्या भारताचे नेतृत्व सावरकर यांच्यासारखे असावे.
२. अनेक क्रांतीकारकांची वैचारिक मांडणी, नेतृत्व सावरकर यांनीच केले. त्यामुळेच ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसमर’ पुस्तकावर प्रकाशन होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी बंदी घातली.