दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याचा अतिरिक्त आयुक्तांचा आदेश !

पुणे – महापालिकेने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसुली करणार्‍या वाहनतळांची पुन्हा एकदा पडताळणी होऊन दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी दिला. (नागरिकांची लूट करणार्‍या ठेकेदाराच्या विरोधात तातडीने कारवाई व्हायला हवी ! – संपादक) ज्या ठेकेदाराच्या संदर्भात तक्रारी येतील, त्याला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, तसेच त्याला निविदा प्रक्रियेत सहभाग दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेने नागरिकांसाठी शहरात ३० वाहनतळे उभारली आहेत. नागरिकांच्या गर्दीनुसार अ, ब, क अशा झोनमध्ये त्यांची वर्गवारी केली आहे. ‘क’साठी दुचाकीचे शुल्क ३ रुपये आणि चारचाकीचे १४ रुपये निश्चित केले आहे; मात्र ठेकेदार वाहनचालकांकडून अतिरिक्त शुल्क घेत होते. निश्चित केलेल्या शुल्काचा उल्लेख असणारा फलक दर्शनी भागात लावलेला नव्हता. शुल्क घेतल्याची पावतीही दिली जात नव्हती. महापालिका अधिकार्‍यांनी पडताळणी केल्यावर नियमानुसार शुल्क आकारून पावती देण्यात आली. दरपत्रक लावण्यात आले; मात्र अधिकारी जाताच ठेकेदाराने नागरिकांकडून पुन्हा अतिरिक्त शुल्क घेण्यास चालू केले. या संदर्भात अतिरिक्त आयुक्तांना विचारल्यावर त्यांनी वरील आदेश दिला.