UP’s Conversion Racket Busted : उत्तरप्रदेशात धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या टोळ्या कार्यरत !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात मोठ्या प्रमाणात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या आणि मुसलमानांच्याही धर्मांतराचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी अनेक टोळ्या काम करत आहेत. धर्मांतरचे दरही समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंबाचे धर्मांतर करणार्‍या दलालाला २० सहस्र रुपये देण्यात येतात, तर धर्म पालटून मुलीचे लग्न लावून दिल्यास १५ सहस्र रुपये अतिरिक्त देण्यात येतात. प्रसिद्ध शाळांपासून ते प्रतिष्ठित संस्थांपर्यंतचे अनेक जण मिशनर्‍यांच्या या धर्मांतराच्या कटात सहभागी आहेत. पैशाची न्यूनता नसल्याने धर्मांतर करणार्‍या टोळ्यांचे जाळे ग्रामीण पातळीवरही पसरले आहे. धर्मांतर करणारे दलाल ‘प्रचारक’ म्हणून त्यांचे काम करत आहेत.

कशी काम करते टोळी ?

१. अशा दलालांना ‘टोळीचे प्रचारक’ म्हणून प्रत्येक गावात तैनात करण्यात येते. ते गरजूंना लक्ष्य करतात. पैशाची न्यूनता असलेले आणि आजारी असलेले लोक त्यांचे लक्ष्य आहेत. अशा लोकांना प्रार्थना सभांमध्ये आणण्याचे दायित्व प्रचारकांचे असते. मिशनर्‍यांनी प्रत्येक वर्गाला लक्षात घेऊन प्रचारकांची नियुक्ती केली आहे. अशा परिस्थितीत, धर्मोपदेशक त्यांच्या समुदायातील लोकांना पटवून देण्यात आणि त्यांना त्यांचा धर्म पालटण्यास प्रवृत्त करण्यात यशस्वी होतात. ही संपूर्ण मोहीम धर्मोपदेशक, तसेच पाद्री यांच्या माध्यमांतून चालवली जात आहे.

२. धर्मांतर करणार्‍या टोळ्यांना काही चर्चकडून पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाच्या एका माजी अधिकार्‍याचा दावा आहे की, ‘जोशुआ प्रोजेक्ट’ संकेतस्थळावरून धर्मांतराचे संपूर्ण जाळे समजू शकतो.

३. उत्तरप्रदेशाच्या श्रावस्ती जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये इकोना परिसरातील धर्मांतराच्या प्रकरणात हरीश सिंह याचे नाव पुढे आले. त्याने ५ वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. गावात परतल्यानंतर त्याने त्याच्या झोपडीत प्रार्थना सभा आयोजित करण्यास चालू केले. सुरक्षा यंत्रणांनी धाड घातल्यानंतर तो गायब झाला.

४. नेपाळ सीमेलगतच्या भागात या प्रकारच्या टोळ्या सक्रीय असल्याचे समोर आले आहे. देवीपाटण विभागातील श्रावस्ती, बहराइच, बलरामपूर आणि गोंडा यांसारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये धर्मांतराची प्रकरणे समोर येताच पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

५. या संदर्भात पोलीस महानिरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, या जिल्ह्यांतील अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील केवळ १३ जिल्ह्यांत धर्मांतराच्या साडेचार सहस्रांहून अधिक टोळ्या कार्यरत !

धर्मांतरासाठी जिल्हा पातळीवर टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. यासाठी प्रयागराजच्या संगम शहरात सर्वाधिक ४४३ सक्रीय पथके कार्यरत असल्याचे समोर आले आहे. महराजगंजमध्ये ३९८, बहराइचमध्ये ३७८, श्रावस्तीमध्ये ३२०, बलरामपूरमध्ये ३३०, गोंडामध्ये ३४०, अयोध्येत ३३३, आंबेडकर नगरमध्ये ३४७, सीतापूरमध्ये ३२६, सिद्धार्थ नगरमध्ये ३४५, अमेठीमध्ये ३१७, रायबरेलीत ३२३ आणि पिलीभीतमध्ये ३४६ सक्रीय पथके हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या मोहिमेत गुंतलेली आहेत. धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचा कायदा उत्तरप्रदेशात लागू असतांना हे सर्व घडत आहे. (राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर करू धजावतात, याचा अर्थ त्यांच्या लेखी कायद्याचे मूल्य शून्यच आहे, असेच म्हणता येईल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

धर्मांतराच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करणे अपेक्षित आहे; मात्र तो अद्याप झाला नसल्याने अशा प्रकारच्या घटनांना चाप लावण्यास अडथळे येत आहेत. हिंदूंनी सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !