
मुंबई – जानेवारी २०२५ मध्ये प्राप्त माहितीच्या आधारे, बनावट कागदपत्रांआधारे भारतीय ओळखपत्र प्राप्त करून घेतल्याप्रकरणी आतंकवादविरोधी पथक आणि विविध स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत राज्यात एकूण ३७ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात एकूण १८ गुन्हे नोंदवण्यात आले. राज्यात वर्ष २०२१ पासून १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अवैधरित्या निवास करणार्या ५३९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे, तसेच १२ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. वेळोवेळी मोहिमा राबवून संशयास्पद बांगलादेशी नागरिकांची माहिती आणि घर भाडेतत्त्वावर देतांना, कामगार म्हणून नियुक्त करतांना भाडेकरू कामगारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात येते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील तारांकित प्रश्नांमध्ये बांगलादेशी घुसखोरीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
ते पुढे म्हणाले की, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये १८ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत १५४ गुन्हे नोंद असून त्यामध्ये २५१ बांगलादेशी नागरीकांना अटक केली आहे. १७ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मूळगावी बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे. एका महिला बांगलादेशी नागरिकाचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.