पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर येथील अनेक बसगाड्यांमध्ये कंडोम, साड्या, बेडशीट, तसेच अंतर्वस्त्रेही सापडली. स्वारगेट स्थानकात चालू असलेल्या धंद्यांची कुंडलीच आता समोर आली आहे. स्वारगेट स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी स्थानक परिसरातील विक्रेते, दुकानदार यांच्याशी संवाद साधला. या वेळी येथे ४० वर्षे व्यवसाय करणारे दुकानदार सुरेश तनपुरे यांनी स्वारगेट आगारात घडणार्या काळ्या धंद्यांची सूचीच मांडली. त्यांनी वृत्तवाहिन्यांना दाखवले की, कुठे आणि कशा प्रकारे अवैध धंदे चालू आहेत. किती गांजा, किती दारू येथे मिळते ? यासाठी कोणते सुरक्षारक्षक किती हप्ते घेतात ? एस्.टी. महामंडळाचे अधिकारी दुकानदारांकडून फळे कशी फुकट घेतात ?, हेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा करणारा आरोपी दत्तात्रय गाडे तब्बल ९ दिवस टोळक्यासमवेत गांजा आणि दारू पिऊन बसलेला होता. हे टोळके अस्तित्वात असल्याची माहिती तनपुरेंनी जवळपास १२ वेळा पोलिसांना लेखी स्वरूपात दिली होती, तसेच संपूर्ण अवैध धंद्यांची माहितीही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिली होती. इतकेच नव्हे, तर १० डिसेंबर २०२४ या दिवशी त्यांनी ही माहिती पोलिसांना पुरवली होती. आगारामध्ये ६-७ फिरत्या विक्रेत्यांची अन्य टवाळखोरांसमवेतची टोळी आहे. हे टोळके स्थानकामध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट असे नशेचे पदार्थ विकते. ते बसस्थानकात छोट्या-मोठ्या चोर्या करते. दारूचे, पत्त्यांचे अड्डे त्यांनी बनवले होते. या टोळक्याने तनपुरे यांच्या दुकानावर आक्रमण करत दगडफेक केली, तसेच व्यवस्थापकालाही मारहाण केली होती. तनपुरे यांनी याची तक्रार पुणे आयुक्तांकडे केली होती; मात्र पुणे पोलिसांनी एवढ्या तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही. कदाचित् तसे झाले असते तर, हा बलात्कार टाळता आला असता. ‘कर्तव्यच्युत आणि भ्रष्ट पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच तो टळला नाही’, असेच म्हणावे लागेल.
स्थानकातील अजून एक गंभीर सूत्र म्हणजे अपुरी विद्युत् व्यवस्था ! रात्रीच्या वेळी येथे अक्षरशः काळोख असतो. स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बंद किंवा निकामी आणि सुरक्षा रक्षक गायब अशी स्थिती आहे. या अंधाराचा अपलाभ घेत गुन्हेगार त्यांचे कृत्य करतात. महिलांची छेडछाड, चोर्या, प्रवाशांना धमकावणे असे प्रकार वारंवार घडत असतांनाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. अपुरी प्रकाशव्यवस्था ही असुरक्षितता आणि अपघात दोहोंना निमंत्रण देते. बसस्थानकापासून जवळच्या पोलीस ठाण्यात काळे धंदे, महिलांवरील अत्याचार, गुंडांचा सुळसुळाट चालू आहे. गुन्हेगारांना एवढे मोठे रान मोकळे करून देणार्या ऐतखाऊ पोलीस यंत्रणेला काय म्हणावे ? या घटनेमुळे संपूर्ण पोलीसयंत्रणा आणि आगार व्यवस्थापन यांच्या भ्रष्ट अन् कामचुकार व्यवस्थेचे भयावह वास्तव उघडे पडले आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे