दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये २२ फेब्रुवारीला ‘(म्हणे) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तपासावे ! – राहुल गांधी यांचे पुणे न्यायालयात आवेदन’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त वाचायला मिळाले. या वृत्ताविषयी मी ‘सनातन प्रभात’ प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रकरणी काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या विधिज्ञाने ज्या ऐतिहासिक नोंदी सादर करण्याची मागणी केली आहे, अशा नोंदी उपलब्ध होतील; परंतु त्या त्वरेने सादर करता येणे अवघड आहे.
भाजपचे शासन केंद्रात आल्यापासून अशा नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न झाले असते, तर त्या चटकन सादर करता आल्या असत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑक्टोबर २०२० या दिवशी मी एक सविस्तर पत्र पाठवले होते. ते पत्र त्यांच्या कार्यालयात २ नोव्हेंबर २०२० या दिवशी पोचले. या पत्राच्या प्रती भाजपच्या अनेक नेत्यांनाही पाठवल्या; परंतु माझ्या पत्राची नोंद घेतली गेली नाही. या पत्राला ‘सनातन प्रभात’ने ६ एप्रिल २०२१ या दिवशी प्रसिद्धी दिली. माझ्या त्या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ऐतिहासिक नोंदीविषयींचा संदर्भांचा भाग मी पुन्हा देत आहे.

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची कागदपत्रे, नोंदी आणि पुरावे यांविषयीची माहिती
अ. ऐतिहासिक नोंदी, अभिप्राय, प्रतिकृती उपलब्ध होण्यासाठी सावरकर अभ्यासक आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम संपत यांच्या इंग्रजी ग्रंथातील ‘व्हॉल्यूम १’ (खंड १) मधील नोंदी पान क्रमांक ४८९ ते ५३३ आणि ‘बिब्लिओग्राफी’ची पाने क्रमांक ५३३ ते ५५७, तसेच ‘व्हॉल्यूम २’मधील नोंदी पान क्रमांक ५८७ ते ६३१ अन् ‘बिब्लिओग्राफी’ची पाने क्रमांक ६३३ ते ६६२ ही उपयोगी पडतील, असे मला वाटते.

आ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या कारागृहात वर्ष १९११ ते १९२१ या काळात ठेवण्यात आले होते. या काळात कारागृहातील घटनांच्या नोंदी अंदमानमध्येच उपलब्ध असावयास पाहिजेत; परंतु असे सांगितले जाते की, वर्ष १९४१ च्या जवळपास झालेल्या मोठ्या भूकंपामुळे अंदमानच्या कारागृहाला मोठी हानी पोचली. त्यामध्ये तेथील कागदपत्रांची हानी झाली. त्याचप्रमाणे त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये ब्रिटिशांनी तेथील कागदपत्रे, नोंदवह्या, विविध पत्रव्यवहार, अभिलेख, प्रतिवृत्ते, अहवाल आदी ब्रिटिशांच्या तत्कालीन मद्रास (तमिळनाडू) कोलकाता-अलिपूर, देहली, मुंबई आणि लंडन येथील प्रमुख कार्यालयांमध्ये ठेवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इ. ज्या न्यायालयांमध्ये सावरकर यांच्या विरोधात अभियोग चालवले गेले, त्या न्यायालयांतील नोंदी, त्यांना ठेवण्यात आलेल्या कारागृहांतील अभिलेख आणि अहवाल मिळवले पाहिजेत.
ई. सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या भागांत जसे की, भगूर, नाशिक, पुणे, मुंबई, लंडन, तसेच त्यांनी दौरे, सभा केलेली ठिकाणे, तेथील पोलीस ठाणी, गुप्तहेर खाते, गृह खाते यांच्याकडील नोंदी, अभिलेख आणि विविध वृत्तपत्रांतील वार्ता यांचाही उपयोग होऊ शकेल.
उ. सावरकर बंधूंना अटक होण्यापूर्वीची आणि त्यांच्या घरावर जप्ती येण्यापूर्वीची त्यांची सांपत्तिक स्थिती, रत्नागिरी येथील स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यानंतरची सांपत्तिक स्थिती हेही कळावे.
ऊ. ब्रिटिशांच्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात ‘बॅरिस्टर’ असलेल्या व्यक्तींना झालेल्या शिक्षा, कारागृहात त्यांना दिली जाणारी वागणूक, दिल्या जाणार्या सुविधा यांची तुलनात्मक माहिती दिली जावी.
ए. सावरकरांनी स्वत:च्या बहुमानाविषयी अन् स्वातंत्र्य संपादनाविषयी इतरांना दिले जाणारे श्रेय यासंदर्भात व्यक्त केलेले विचार (मुख्यत: १० मे ते १२ मे १९५२ या दिवसांमध्ये पुण्यातील ‘अभिनव भारत’च्या सांगता समारंभात व्यक्त केलेले विचार) यांचीही नोंद घेता येईल.
२. ‘भारतरत्न’ आणि ‘स्वातंत्र्यवीर’ या उपाधींविषयी… :
अ. ‘भारतरत्न’ पुरस्काराविषयी : ‘भारतरत्न’ या सन्मानाने आजपर्यंत गौरवलेल्या काही व्यक्ती केवळ एका विशिष्ट क्षेत्रात महान कार्य करणार्या होत्या/आहेत. सावरकर ‘शतपैलू’ असल्याचे त्यांचे एकूण चरित्र आणि कामगिरी यांवरून वाटते. सावरकर यांना त्यांच्या मृत्यूसमयी श्रद्धांजली वहातांना सुप्रसिद्ध संसदपटू आणि समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै म्हणाले होते, ‘भारतरत्न हाच हिंदुस्थानचा सर्वाेच्च बहुमान असेल, तरच तो सावरकर यांना दिला जावा; कारण तसा सन्मान दिल्याने त्या पुरस्काराचाच बहुमान होणार आहे.’
आ. ‘स्वातंत्र्यवीर’ या उपाधीविषयी : कै. पां.भ. बापट यांना ‘सेनापती’, बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’, मोहनदास गांधी यांना ‘महात्मा’, बापूजी अणे यांना ‘लोकनायक’, सुभाषचंद्र बोस यांना ‘नेताजी’, ज्योतीराव फुले यांना ‘महात्मा’, भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ अशा दिल्या गेलेल्या उपाधींप्रमाणे विनायक दामोदर सावरकर यांना जनतेनेच दिलेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी द्यायला हवी. सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणार्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा येथेही ठरावाद्वारे सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी घोषित करावी. सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ अथवा ‘वीर’ ही उपाधी जनतेनेच १०० वर्षांपूर्वीच दिली आहे.
इ.स. १९२४ मध्ये श्री. सदाशिव राजाराम रानडे यांनी लिहिलेल्या सावरकर यांच्या चरित्राचे नाव ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र’ असे होते. त्यात म्हटले आहे, ‘रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असतांना अल्प कालावधीसाठी सावरकर यांना नाशिक येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमास जाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी वीर वामनराव जोशी यांनी सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून गौरवले होते. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भाषणाच्या वृत्तांमध्ये किमान ४ वेळा तरी सावरकर यांचा ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून उल्लेख सापडतो.’
कवी वैशंपायन यांनी त्या वेळी रचलेल्या कवितेतही ‘स्वातंत्र्यवीर’ असाच उल्लेख आहे. मासिक ‘स्वातंत्र्य’च्या ४ सप्टेंबर १९२४ च्या अंकात चिटणीस प्रभाकर, फलज्योतिष संशोधन कार्यालय यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर कुंडली’ विचार या लेखातही असा उल्लेख आहे. (संदर्भ : बाळाराव सावरकर यांनी संपादित केलेला ‘रत्नागिरी पर्व’ हा ग्रंथ आणि श्री. अक्षय जोग यांनी लिहिलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर – आक्षेप आणि वास्तव’ हा ग्रंथ)
– श्री. श्रीकांत ताम्हणकर, पुणे. (२३.२.२०२५)