अल्पवयीन मुलीला जाळले !
मुंबई – अंधेरी येथे अल्पवयीन मुलीच्या आईने तिला मित्राला भेटण्यास विरोध केला. या रागातून मित्राने १७ वर्षांच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती ६० टक्के भाजली. तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला.
विद्यार्थिनींना केले वसतीगृहात कुलूपबंद
यवतमाळ – येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थिनींना डीबीटीच्या (थेट लाभ हस्तांतरण) वतीने दिला जाणारा मोबदला मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांच्या भोजनाचे नियोजन रखडले. यासाठी विद्यार्थिनी आंदोलन करणार असल्याचे समजल्यावर येथील शिवाजी नगरस्थित आदिवासी वसतीगृह क्र. २ मधील विद्यार्थिनींना वसतीगृहातच कुलूपबंद करून पोलिसांना बोलावण्यात आले, हा आरोप विद्यार्थिनींनी केला.
टेंपोची रेल्वे फाटकाला धडक !
मुंबई – मध्य रेल्वेवरील आंबिवली – टिटवाळा स्थानकांदरम्यानच्या समांतर रस्ता फाटकाला सकाळी टेंपोने धडक दिली. यात फाटकाची पुष्कळ हानी झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल दुपारी ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या.
मराठीत पाटी नसल्यास १ लाख रुपये दंड !
नागपूर – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ च्या कलम ३६ मधील प्रावधानानुसार प्रत्येक दुकानाच्या पाट्यांवर देवनागरी लिपीतील मराठी भाषा आणि त्यातील अक्षर किंवा आकार इतर कोणत्याही भाषेतील मजकुरापेक्षा मोठा असावा, असे निर्देश अतिरिक्त कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांनी दिले आहेत. या निर्देशाचे उल्लंघन करणारे १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेस पात्र राहील.
गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक करणारे चौघे अटकेत !
नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून प्रतिबंध गोवंश मांसाची अवैधरित्या वाहतूक करणार्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. अजहर इलाईस शहा, अब्दुल समद जावेद कुरेशी, झाकीर निसार पठाण आणि नानू कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. १ सहस्र २०० किलो मांस जप्त केले आले.
संपादकीय भूमिका : गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी होणार ?