गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे ! – पंकजा मुंडे पालवे, पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री

महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘अधिवक्ता कार्यशाळे’त बोलताना पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

पुणे – ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या ‘गोसंवर्धन आणि गोसंरक्षणा’च्या कार्याला शासनाचा पूर्ण पाठिंबा आहे. पशूंच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जातील. गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे राज्याचे पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी स्पष्ट केले. त्या महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘अधिवक्ता कार्यशाळे’त बोलत होत्या. या कार्यशाळेमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यावरील प्रकरणे हाताळणारे राज्यभरातील १०० अनुभवी अधिवक्ता, तसेच पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

‘गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले की, राज्यात एकूण १ सहस्र ६७ गोशाळा आहेत. काही गोशाळांनी नोंदणी केली नाही, तरी गोशाळांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. गोशाळा स्वावलंबी झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आयोग कार्य करत आहे. या वेळी आयोगाची स्वतंत्र ‘गोरक्षक समिती’ स्थापन करण्याची मागणी शेखर मुंदडा यांनी केली. गाय ही आपल्या संस्कृतीचा, धार्मिकतेचा आणि जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. गायीच्या दुधाचा आणि शेणाचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. गोवंश हत्येमुळे छोट्या शेतकर्‍यांवर आर्थिक संकट येते आणि त्यांचे जीवनमान प्रभावित होते, असेही मुंदडा यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

गाय ही भारतीय संस्कृती आणि धार्मिकता यांचा अविभाज्य भाग असल्याने तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे !