पीडित तरुणाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
पुणे – ‘मला मारहाण करणार्या आरोपींना कुणीही चिथावणी दिली नव्हती’, असा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र गजानन मारणे टोळीतील सदस्यांनी मारहाण केलेल्या अभियंता तरुणाने न्यायालयात प्रविष्ट केले. ‘आरोपींनी कुणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही’, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मारणे टोळीतील गुंडांनी कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्याची नोंद घेत पुणे पोलिसांनी गजानन मारणेसह अन्य ६ जणांवर मकोका कारवाई केली. या प्रकरणी तक्रारदार तरुणाला भर चौकात जिवे मारण्यासाठी गजानन मारणे याने साथीदारांना चिथावणी दिली, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यामुळे विशेष न्यायाधीश व्ही.आर्.कचरे यांनी आरोपी गजानन मारणे याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
‘आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे आणि पळून गेलेल्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे म्हणून आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ व्हावी’, अशी मागणी साहाय्यक आयुक्त गणेश इंगळे अन् विशेष सरकारी अधिवक्ता विलास पठारे यांनी केली. आरोपींच्या पोलीस कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.