आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाच्या निमित्ताने राष्ट्रहिताविषयीच्या त्यांच्या अपरिमित दूरदृष्टीचे एक जाज्वल्य उदाहरण या लेखाद्वारे सादर करत आहे.
१. ब्रिटिशांची सैन्यभरती म्हणजे स्वतंत्र हिंदुस्थानचे सबळ सैन्य स्थापण्याची नांदी समजणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
सप्टेंबर १९३९ मध्ये युरोपमध्ये दुसरे महायुद्ध चालू झाले. ब्रिटन त्या महायुद्धात ओढले गेलेच. ब्रिटिशांनी हिंदुस्थानामध्ये सैन्यभरती चालू झाली. जागतिक परिस्थितीचे आकलन नसलेला काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेते यांनी त्याला विरोध केला; परंतु स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर यांना त्यात राष्ट्रहिताची अनमोल संधी दिसली. आज ना उद्या हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळणार होतेच. त्या वेळी जगामध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे रहाण्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचे सबळ सैन्य असणे अत्यावश्यक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांची सैन्यभरती ही स्वतंत्र हिंदुस्थानचे सबळ सैन्य स्थापन करण्याची नांदी दिसली. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी आणि ‘वर्णाश्रम स्वराज्य संघ’ यांसारख्या समविचारी पक्षांनी स्वतंत्र हिंदुस्थानचे सबळ सैन्य स्थापन करण्याची संधी म्हणून सैन्यभरतीचे स्वागत केले अन् देशभरात सैनिकीकरणाची मोहीम चालू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि धर्मवीर विश्वासराव डावरे हे मोहिमेचे नेते होते. ‘हिंदुस्थानी तरुणांनी सैन्यदलांच्या विविध क्षेत्रांमध्ये भरती व्हावे’, असे त्यांनी आवाहन केले.
२. ब्रिटीश सैन्यात हिंदुस्थानी तरुणांच्या भरतीमुळे झालेला परिणाम

त्याची परिणती, म्हणजे हिंदुस्थानातील सर्व प्रांतांमधून अनेक देशभक्त तरुण सैन्यदलांच्या विविध क्षेत्रांमध्ये भरती झाले. त्या हिंदुस्थानी तरुणांना सैन्यदलांच्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळून विविध देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धात भाग घेता आला. देशभक्त हिंदुस्थानी तरुणांना मिळालेला तो अनुभव अद्वितीय होता. त्यासह अजून मोठे परिवर्तन अजाणतेपणे घडत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि धर्मवीर विश्वासराव डावरे यांच्या प्रेरणेने सप्टेंबर १९३९ नंतर भरती झालेल्या हिंदुस्थानी तरुणांमध्ये जाज्वल्य देशभक्ती होती. परिणामतः ब्रिटीश ‘इंडियन आर्म्ड फोर्सेस’च्या (भारतीय सशस्त्र सैन्याच्या) सैनिकांमध्ये देशभक्तीचा टक्का वाढला होता.
३. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ऐतिहासिक भेट अन् आझाद हिंद फौजची पहिली तुकडी स्थापन !
नेताजी बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २२ जून १९४० या दिवशी भेट झाली. त्या ऐतिहासिक भेटीमध्ये काय चर्चा झाली, हे जरी गुप्त ठेवले होते, तरी दोन समविचारी नेत्यांमध्ये काय ठरले, ते पुढे योग्य वेळी जगासमोर आलेच. हिंदुस्थानातील ब्रिटीश सरकारच्या गुप्तहेरांची कडक नजर असूनही १७ जानेवारी १९४१ या दिवशी नेताजी बोस त्यांच्या हातांवर तुरी देऊन अफगाणिस्तानमार्गे जर्मनीमध्ये गेले. तत्कालीन जर्मन सरकारशी संधान बांधून आणि त्यांच्या कह्यातील ‘ब्रिटीश इंडियन आर्म्ड फोर्सेस’च्या हिंदुस्थानी युद्धबंद्यांमधून स्वतंत्र हिंदुस्थानचे सैन्य (आझाद हिंद फौज) उभे करण्यास नेताजींनी प्रारंभ केला. त्याप्रमाणे पहिली ४ सहस्र सैनिकांची आझाद हिंद फौजेची तुकडी स्थापन केली. हिंदुस्थानवरील इंग्रजी सत्तेवर अफगाणिस्तानच्या बाजूने आक्रमण करण्याची त्यांची योजना होती. त्या सुमारास जर्मन सेना रशियाच्या आघाडीवर अडकली होती. आग्नेय आशियामध्ये जपानची सरशी होत होती; म्हणून नेताजी बोस फेब्रुवारी १९४३ मध्ये जर्मनीहून पाणबुडीमार्गे निघून सुमात्रा बेटांवर मे १९४३ मध्ये आणि पुढे सिंगापूरला गेले.

४. ‘इंडियन नॅशनल आर्मी (आझाद हिंद फौज)’ आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे अस्थायी सरकार यांची स्थापना
अ. सिंगापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४ जुलै १९४३ या दिवशी ‘इंडियन नॅशनल आर्मी (आझाद हिंद फौज)’ची स्थापना केली. जपानच्या कह्यातील ‘ब्रिटीश इंडियन आर्म्ड फोर्सेस’च्या हिंदुस्थानी युद्धबंद्यांपैकी ६० सहस्र हिंदुस्थानी तरुण स्वेच्छेने ‘आझाद हिंद फौजे’मध्ये भरती झाले.
आ. नेताजी बोस यांनी २१ ऑक्टोबर १९४३ या दिवशी ‘स्वतंत्र हिंदुस्थानच्या अस्थायी सरकार (अर्झी हुकूमत-ए-आझाद हिन्द)’ची स्थापना केली.
इ. २९ डिसेंबर १९४३ या दिवशी पोर्ट ब्लेअर, अंदमान येथे स्वतंत्र हिंदुस्थानचा राष्ट्रीय ध्वज उभारून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘अर्झी हुकूमत-ए-आझाद हिन्द’ने ‘अंदमान आणि निकोबार बेटे’ ब्रिटिशांपासून स्वतंत्र केली आहेत’, असे घोषित केले.
५. ‘अर्झी हुकूमत-ए-आझाद हिन्द’ आणि ‘आझाद हिंद फौज’ यांची घोडदौड
७ जानेवारी १९४४ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘अर्झी हुकूमत-ए-आझाद हिन्द’ आणि ‘आझाद हिंद फौज’ यांची मुख्यालये सिंगापूरहून ‘रंगून’ या ब्रह्मदेशाच्या (आताचे म्यानमार) राजधानीमध्ये स्थलांतरित केली. ब्रह्मदेशातून हिंदुस्थानच्या मणीपूर प्रांतावर ‘आझाद हिंद फौजे’ने आक्रमण करून १८ मार्च १९४४ या दिवशी ‘कोहिमा’ हे महत्त्वाचे शहर कह्यात घेतले आणि तेथे स्वतंत्र हिंदुस्थानचा राष्ट्रीय ध्वज उभारला.
६. वीर सावरकर यांच्या आवाहनामुळेच प्रशिक्षित सैनिकांचा पुरवठा होत असल्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खुलेपणाने सांगणे
२५ जून १९४४ या दिवशी ‘आझाद हिंद रेडिओ’वरून नेताजींनी ‘त्यांच्या सर्व कार्यामागील प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे’, असे सांगून त्यांचे शतशः आभार व्यक्त केले. नेताजी म्हणाले, ‘चुकीच्या राजकीय प्रवृत्तींमुळे आणि दूरदृष्टीअभावी काँग्रेसचे नेते आझाद हिंद फौजेच्या देशभक्त सैनिकांना ‘पोटभरू’ म्हणून चिडवत होते; परंतु वीर सावरकर हिंदुस्थानी युवकांना सशस्त्र सैन्यात जाण्याचा आग्रहाने उपदेश करत आहेत, हे उत्साहजनक आहे. वीर सावरकर यांच्या प्रेरणेने सैन्यात भरती झालेल्या हिंदुस्थानी युवकांमधूनच आमच्या आझाद हिंद फौजेला प्रशिक्षित सैनिकांचा पुरवठा होत आहे.
नेताजी बोस यांची ग्वाही आणि स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर यांचे अद्वितीय कार्य यांमुळे त्यांना कोट्यवधी भारतियांच्या वतीने आमची मानवंदना !
– विंग कमांडर विनायक पुरुषोत्तम डावरे (निवृत्त), पुणे. (२६.२.२०२५)