‘४.२.२०२५ (रथसप्तमी) या दिवशी माझा लहान भाऊ रवींद्र होनावळे (वय ५६ वर्षे) याचे निधन झाले. त्याचे द्वितीय मासिक श्राद्ध चैत्र शु. सप्तमी (४.४.२०२५) या दिवशी आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. भावाला यकृत आणि मूत्रपिंड यांसंबंधीचे आजार होणे
माझा भाऊ रवींद्र एका शाळेत चित्रकलेचा शिक्षक म्हणून नोकरी करत होता. त्याच्या यकृताचा आकार लहान असल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्याला ‘लिव्हर सिरोसिस (यकृताची रचना आणि कार्य यांत पालट होणे, तसेच यकृताची क्षमता न्यून होणे)’ हा आजार झाला. त्यामुळे ८ वर्षांपूर्वी त्याचे ‘यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट)’ हे शस्त्रकर्म केले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अपार कृपेने ते यशस्वीरित्या पार पडले होते. त्यानंतर त्याच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण वाढत गेले. (टीप : सर्वसाधारणपणे निरोगी पुरुषाच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण ०.७ ते १.४ मिलीग्रॅम प्रती डेसिलीटर असते. व्यक्तीचे वय, वजन आणि प्रयोगशाळा यांनुसार यात पालट होऊ शकतो.) त्यामुळे
३ वर्षांपासून महिन्यातून काही वेळा भावाला ‘डायलिसिस’ करावे लागायचे. (डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया !)
२. भावाला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करणे आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून भावासाठी नामजपादी उपाय केल्याचे दिसणे
४.२.२०२५ या दिवशी माझ्या भावाला पुणे येथील रुग्णालयात भरती केले. त्या वेळी त्याला ‘न्यूमोनिया’ झाला होता. हे कळल्यावर मला नेहमीपेक्षा अधिक अस्वस्थ वाटत होते; म्हणून मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, भावाला तुमच्या चरणी अर्पण केले आहे. आतापर्यंत तुम्हीच त्याची काळजी घेतली आहे. आताही तुम्हाला अपेक्षित असे होऊ द्या.’ त्यानंतर मला सकाळी ११ वाजता पुढील दृश्य दिसले, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सूक्ष्मातून अतिदक्षता विभागात भावाच्या पलंगाजवळ उभे आहेत. त्यांनी त्यांचा डावा हात भावाच्या छातीवर आणि उजवा हात त्याच्या सहस्रार चक्रावर ठेवला आहे. त्यानंतर भावाच्या छातीतून काळे गोळे बाहेर पडत आहेत, असे मला दिसू लागले. हे दृश्य मला बराच वेळ दिसत होते. त्यानंतर काही वेळाने गुरुदेव तिथून बाजूला झाले.’ ‘गुरुदेवांनी भावाचा त्रास पुष्कळ न्यून केला’, असे मला जाणवले. त्याच दिवशी संध्याकाळी भावाचे निधन झाले.

३. भावाच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती
अ. ४.२.२०२५ या दिवशी भावाचे निधन झाले. त्या वेळी रुग्णालयात दाब जाणवत नव्हता. भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मनाला चांगले जाणवत होते.
आ. भावाचा एक डोळा थोडा उघडा होता. ‘त्या डोळ्यातून तो माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवले.
इ. दुसर्या दिवशी सकाळी भावाचे पार्थिव त्याच्या घरी नेण्यात आले. त्या वेळी ‘तो शांत झोपला आहे’, असे मला जाणवले.
ई. मी मनातून भावाला सांगितले, ‘रवी, तू ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप कर.’ तेव्हा तो सूक्ष्मातून मला म्हणाला, ‘मी हा नामजप करत आहे.’
उ. या कठीण प्रसंगात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आम्हा सर्व कुटुंबियांना स्थिर ठेवले.
ऊ. काही दिवसांनी मला सूक्ष्मातून काही वेळा भावाचा लिंगदेह दिसला. तेव्हा त्याच्या लिंगदेहाभोवती अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे पिवळ्या रंगाचे संरक्षक कवच दिसत होते.
४. कै. रवींद्र यांची गुणवैशिष्ट्ये
४ अ. श्रीकृष्णाचा धावा आणि नामजप करणे : ३.११.२०२४ या भाऊबिजेच्या दिवशी भाऊ मला म्हणाला, ‘‘मी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करतो.’’ तेव्हा मी त्याला ‘या नामजपासह दत्ताचा नामजपही कर’, असे सांगितले. तेव्हा ‘पुष्कळ वेदना होत असतांना मी कृष्णाचा धावा करतो’, असे त्याने मला सांगितले.
४ आ. भावाने आजारपणात कधीच चिडचिड केली नाही.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, आपण सर्व साधकांचा एकमेव आधार आहात. प्रत्येक कठीण प्रसंगात आपण आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला स्थिर ठेवता ! आपण साधकांच्या कुटुंबियांचीही सर्वतोपरी काळजी घेता. याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. राजश्री अरुण खोल्लम (कै. रवींद्र होनावळे यांची मोठी बहीण), पुणे (५.३.२०२५)
कै. रवींद्र होनावळे यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा होनावळे (वय ५० वर्षे) यांना आलेले काही चांगले अनुभव
१. यजमानांची रुग्णसेवा सकारात्मक राहून मनोभावे करणे
‘माझे यजमान श्री. रवींद्र रुग्णाईत असतांना मी त्यांची सेवा मनापासून केली, उदा. त्यांना रुग्णालयात घेऊन जाणे, औषधे देणे. हे सर्व करण्यात मला आनंद मिळत असे. ‘माझ्या जीवनात असा कठीण प्रसंग का आला ?’, असा नकारात्मक विचार माझ्या मनात कधीच आला नाही.
२. रुग्णालयात, तसेच रिक्शाने ये-जा करतांना कोणताही वाईट अनुभव न येणे
रात्री-अपरात्री मी आणि यजमान रिक्शाने रुग्णालयातून घरी येतांना आम्हाला कधीच वाईट अनुभव आला नाही. सर्व चांगलेच रिक्शावाले आम्हाला भेटले. रुग्णालयातही कधी वाईट अनुभव आला नाही.
३. परिचित व्यक्तींनी पुष्कळ आधार देणे
या कठीण प्रसंगात आमच्या वसाहतीतील सर्व लोक, तसेच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला पुष्कळ आधार दिला अन् साहाय्य केले. त्यासाठी त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती सुवर्णा रवींद्र होनावळे (कै. रवींद्र होनावळे यांच्या पत्नी), पुणे (५.३.२०२५)
|