सावंतवाडी तालुक्यातील एका जत्रोत्सवात चालणारा जुगार महिला पोलीस पाटील यांनी उधळला

सावंतवाडी – तालुक्यातील एका गावात जत्रोत्सवाच्या वेळी चालू असलेला जुगार पोलीस पाटील असलेल्या एका कर्तव्यदक्ष महिलेने उधळून लावला. वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रणरागिणीचे रूप घेत तिने जुगाराचे साहित्य अक्षरश: जाळून टाकले. तिने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध गावांतून जत्रोत्सव साजरा केला जात आहे. या जत्रोत्सवाच्या वेळी जुगार खेळण्याच्या घटनाही घडत असतात. सावंतवाडी पोलिसांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटिलांना अशा प्रकारची घटना घडल्यास त्याला अटकाव करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जुगार खेळल्या जाणार्‍या एका गावातील जत्रोत्सवात जाऊन पोलीस पाटील असलेल्या संबंधित महिलेने संबंधितांना तो प्रकार त्वरित बंद करण्याच्या सूचना केल्या, तसेच याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर जुगार बंद करण्यात आला; मात्र पुन्हा मध्यरात्री त्याच ठिकाणी जुगार खेळला जाऊ लागला. हे समजताच महिला पोलीस पाटील तेथे पोचल्या. जुगार खेळणार्‍यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे त्यांनी संतापाने जुगाराचा डाव उधळला आणि तेथे असलेल्या जुगाराच्या साहित्याला आग लावली. हे पाहून जुगार खेळणारे पसार झाले.

‘जुगारावर पूर्णपणे बंदी असून अशा घटना निदर्शनास आल्यास स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.