धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा ! – आमदार नीलेश राणे, शिवसेना

आमदार नीलेश राणे

कुडाळ – न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. असे असतांना ‘अजान’ (मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे) देतांना याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी, असे पत्र शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी नुकतेच कुडाळ पोलीस ठाण्यात दिले होते.

कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्याद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण हे कळीचे सूत्र बनले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. काही धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेले भोंगे प्रत्यक्षात आवाजाची मर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे असे भोंगे लावण्यास स्थानिक पोलीस ठाण्याची अनुमती घेणे आणि आवाजाची मर्यादा पाळून ते लावणे बंधनकारक आहे. तरी तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावरून होणारे ध्वनीप्रदूषण यांच्या विरोधात धडक कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

अनधिकृत भोंगे आणि आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांवर कारवाई करणार ! – कुडाळ पोलीस

आमदार राणे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी १२ डिसेंबर या दिवशी अनधिकृत भोंग्यांविषयी सर्वधर्मियांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी, ‘सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्यशासनाने काढलेल्या आदेशाचे पालन केले नाही, तर अनधिकृत भोंगे लावणार्‍यांवर गुन्हा नोंद केला जाईल, तसेच आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली.