फोंडा, १२ डिसेंबर (वार्ता.) – ‘हिंदू रक्षा समिती, फोंडा’ यांनी १९ डिसेंबरला सायंकाळी फोंडा येथील जुने बसस्थानक (इंदिरा मार्केट) येथे आयोजित केलेल्या भव्य सभेला प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा जिहादी मानसिकतेच्या विरोधात प्रखरपणे बोलणार्या माधवी लता संबोधित करणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे नेते श्री. मोहन आमशेकर यांनी दिली आहे. कुडचडे येथे ८ डिसेंबर या दिवशी बजरंग दलाने काढलेली फेरी आणि त्यानंतरची सभा यांच्या यशानंतर त्याच धर्तीवर फोंडा येथे १९ डिसेंबर या दिवशी भव्य फेरी आणि सभा घेण्याचा निर्णय हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नुकताच घेतला आहे.
श्री. मोहन आमेशकर पुढे म्हणाले, ‘‘फोंडा येथे होणार्या सभेसाठी १२ डिसेंबर या दिवशी तपोभूमी येथील पिठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. सभेच्या प्रचारासाठी मठमंदिरांच्या भेटीगाठी चालू आहेत, तसेच पंचायत स्तरांवर आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या बैठकांनाही प्रारंभ झालेला आहे. सभेच्या आयोजनावरून सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.’’