कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि धर्मांतर यांवर जनजागृती करण्याविषयी आवाहन करण्यात येणार !
नागपूर – आगामी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यात देश-विदेशातील १०० हून अधिक बौद्ध भिक्खू आणि लामा यांचा सहभाग रहाणार असून त्यांचे एक शिबिरही होणार आहे. या शिबिराला विश्व हिंदु परिषद सर्वतोपरी साहाय्य करणार आहे, तसेच देशभरातील युवा साधू आणि साध्वी यांची २ स्वतंत्र संमेलने आयोजित केली आहेत. यामध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि धर्मांतर यांवर जनजागृती करण्याविषयी आवाहन केले जाईल. हे युवा साधू आणि साध्वी यासाठी देशभर प्रवास करणार आहेत, अशी माहिती विहिंपचे केंद्रीय महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी येथे दिली. विहिंपच्या दोन दिवसांच्या शिबिरासाठी नागपूर येथे आले असता ते बोलत होते.
श्री. मिलिंद परांडे म्हणाले की,
१. देशात ७१२ जनजाती (वनवासी वा आदीवासी) समूह असून त्यांची संख्या ११ कोटी आहे. या जनजातीय बांधवांना विहिंपच्या वतीने कुंभमेळा दर्शन आणि कुंभ स्नान घडवण्यात येणार आहे. जैन, बौद्ध, स्वामी नारायण, वारकरी, बंजारा, महानुभाव, रामदासी आदी पंथांच्या युवा साधू-संतांची सूची करून त्यांना आमंत्रित केले आहे.
२. समर्थ भारत करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने आखलेल्या धोरणास विविध संप्रदायातील सर्व साधूसंतांनी संपूर्ण पाठिंबा देण्याची विनंती आम्ही केली आहे.
३. धर्मांतरितांची घरवापसी केली पाहिजे, यावर भर देण्यात येणार आहे.