आंतरराष्‍ट्रीय नाथ संमेलनात महाराष्‍ट्राचे प्रतिनिधीत्‍व करणारे मिलिंद चवंडके हे ‘अहिल्‍यानगरचे भूषण’च !

मिलींद चवंडके यांचा सन्‍मान करतांना मान्‍यवर

नगर – आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नाथ संमेलनात महाराष्‍ट्राचे प्रतिनिधीत्‍व करणारे मिलिंद सदाशिव चवंडके हे अहिल्‍यानगरचे आणि लिंगायत गवळी समाजाचे भूषणच आहेत. पत्रकारितेचा वसा गेली अडीच तपे सांभाळतांना त्‍यांनी नाथ संप्रदायाच्‍या संशोधनात आणि प्रवचनसेवेत आपल्‍या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे, अशा शब्‍दांत कौतुक करत सर्वश्री गोविंदराव मिसाळ, राजेंद्र भागानगरे, बाळासाहेब दहिंडे, सुनील गोडळकर यांनी पुष्‍पगुच्‍छ देऊन मिलिंद चवंडके यांना गौरवले.

पत्रकारिता प्रामाणिकपणे करतांना मिलिंद चवंडके यांनी सामाजिक, शैक्षणिक, साहित्‍यिक, सांस्‍कृतिक, धार्मिक, सार्वजनिक क्षेत्रांत भरीव योगदान दिले. ते नगर जिल्‍हा इतिहास संशोधन मंडळाच्‍या कार्याध्‍यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या देखाव्‍यांचे सलग १८ वर्षे परीक्षक म्‍हणून काम पाहिले आहे. निबंध, वक्‍तृत्‍व, वादविवाद, वेशभूषा, पाककृती, रांगोळी, चित्रकला, लोककला आदी स्‍पर्धांचे परीक्षक म्‍हणून कार्य केले आहे. दैनिक, साप्‍ताहिक, पाक्षिक, मासिक, विशेषांक, कॅलेंडर, दीपावली अंक यामध्‍ये मिलिंद चवंडके यांनी लिहिलेल्‍या कथा, कविता, प्रासंगिका, चारोळ्‍या, हायकू, प्रवासवर्णन, व्‍यक्‍तीचित्रण, ललित, लेखमाला, संशोधनपर लेख असे साहित्‍य प्रकाशित झाले आहे.

श्री. मिलिंद चवंडके

नाथ संप्रदायाच्‍या इतिहासात प्रथमच मिलिंद चवंडके यांनी मराठीत ओवीबद्ध लिहिलेल्‍या ॥ श्रीकानिफनाथ माहात्‍म्‍य ॥ या रसाळ पोथीची प्रशंसा प.पू. शंकराचार्यांसह मान्‍यवर मठाधिपती-पिठाधिपती यांनी केली. अवघ्‍या २७ दिवसांत या १००० पोथ्‍यांची विक्री झाली. उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ हे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असलेल्‍या विश्‍व हिंदु महासंघाच्‍या गोरक्षा विभागाचे महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्षपद मिलिंद चवंडके भूषवित आहेत.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ परिवारातील विविध पदांचे दायित्‍व राष्‍ट्रसेवा-धर्मकार्य यांच्‍या सद़्‍भावनेने त्‍यांनी ४०-४२ वर्षे सांभाळले आहे. नर्मदेची पायी परिक्रमा ९३ दिवसांत त्‍यांनी पूर्ण केली आहे. धार्मिक सोहळ्‍यांच्‍या प्रसिद्धीची सेवा श्रद्धेने करणारे अहिल्‍यानगरमधील एकमेव पत्रकार अशी ओळख स्‍वतःच्‍या निरपेक्ष कार्यामधून मिलिंद चवंडके यांनी निर्माण केली आहे. प्रवचन आणि लेखन यांमधून प्रभावीपणे ते धर्मजागरणाचे कार्य करत आहेत. त्‍यांच्‍या सामाजिक, सार्वजनिक आणि धार्मिक कार्याची नोंद वर्ल्‍ड बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन त्‍यांना सन्‍मानित केले आहे. वर्ल्‍ड बुक ऑफ रेकॉर्डने गौरवलेले भारतभरातील लिंगायत गवळी समाजामधील मिलिंद चवंडके हे पहिलेच आहेत. त्‍यांचे एकूणच कार्य लिंगायत गवळी समाजाची आणि अहिल्‍यानगरची मान उंचावणारे ठरले आहे, असे मनोगत या कौतुक सोहळ्‍यात व्‍यक्‍त करण्‍यात आले.