प्रकृती चिंताजनक : अतीदक्षता विभागात उपचार चालू
कोलकाता (बंगाल) – येथील इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी सांगितले की, बांगलादेशातील हिंदु समाजाचा प्रमुख चेहरा असलेले चिन्मय प्रभु यांची बाजू मांडणारे अधिवक्ता रमेन रॉय यांच्यावर पाशवी आक्रमण करण्यात आले आहे. त्यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. रॉय गंभीररित्या घायाळ झाले असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
राधारमण दास यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत समवेत रॉय यांच्यावर रुग्णालयातील अतीदक्षता विभागात चालू असलेल्या उपचाराचे छायाचित्रही पोस्ट केले आहे. त्यांनी रॉय यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे. चिन्मय प्रभु यांना कथित देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांचा जामिनासाठीचा अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यांच्या प्रकरणाची सुनावणी २ जानेवारी २०२५ या दिवशी होणार आहे.
चिन्मय प्रभु यांची बाजू मांडणार्या अधिवक्त्यांना सुरक्षा पुरवावी !
रॉय यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर सुरक्षेच्या कारणास्तव चिन्मय प्रभु यांची बाजू मांडण्यासाठी अन्य कोणताही अधिवक्ता पुढे आलेला नाही. आम्ही बांगलादेश सरकारला विनंती करू की, या प्रकरणात चिन्मय प्रभु यांची बाजू मांडण्यास सिद्ध असलेल्या अधिवक्त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवली जावी, असेही राधारमण दास यांनी म्हटले.
सार्वजनिक ठिकाणी स्वतःची धार्मिक ओळख उघड होईल, असे कपडे घालू नका ! – बांगलादेशातील इस्कॉनच्या अनुयायींना सल्ला
राधारमण दास यांनी सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती चिंताजनक आहे. जे साधू आणि भक्त आम्हाला दूरभाष करत आहेत, त्यांना आम्ही इस्कॉनचे अनुयायी किंवा साधू म्हणून स्वतःची ओळख सार्वजनिक न करण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांना घरांमध्ये किंवा मंदिरांमध्ये त्यांचा धर्म पाळण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांना असे कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे जे इतरांचे लक्ष वेधून घेत नाहीत. हा उपाय तात्पुरता असून केवळ त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आहे. हा सल्ला किंवा सामान्य मार्गदर्शक सूचना नाही; परंतु गेल्या काही दिवसांपासून सतत आम्हाला दूरभाष करणार्या साधू आणि भक्त यांना ही माझी वैयक्तिक सूचना आहे. आमच्या अनेक भाविकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यांना घाबरवले जात आहे.
संपादकीय भूमिकाजर भारताने पावले उचलली नाहीत, तर अशी वृत्ते प्रतिदिन वाचावी लागणार आहेत ! |