अमेरिकेतील विद्यापिठांचे आवाहन
वॉशिंग्टन – २० जानेवारीला डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी भारतियांसह विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांची हिवाळी सुटी आटोपून अमेरिकेत परत यावे, असे आवाहन विविध विद्यापिठांनी विद्यार्थ्यांना केले आहे. संभाव्य प्रवास निर्बंध टाळण्यासाठी आणि प्रवेश बिंदूंवर कडक तपासणीपासून मुक्तता मिळवण्यासाठी असे आवाहन करण्यात आले आहे, असे विद्यार्थ्यांना जारी करण्यात आलेल्या सूचनेत म्हटले आहे. डॉनल्ड ट्रम्प यांचे सत्तेत पुनरागमन होताच लोकांना अमेरिकेत जाणे कठीण होणार आहे, असे मानले जाते आहे.
१.अमेरिकेच्या इतिहासातील अवैध स्थलांतरितांचे माघारी पाठवण्याची सर्वांत मोठी सामूहिक मोहीम राबवण्याची चेतावणी ट्रम्प यांनी दिली आहे.
२. वैध व्हिसा असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसली, तरी जोखीम पत्करू नये, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.
३. ट्रम्प यांच्या पुनरागमनापूर्वी काही शैक्षणिक संस्थांनी त्यांची शैक्षणिक कार्यक्रम पत्रिका पालटल्या आहेत. ओरेगॉनच्या सालेम येथील विलामेट विद्यापिठातील डेटा सायन्समधील पदव्युत्तर विद्यार्थ्याने सांगितले की, त्यांचे वर्ग सहसा वर्षाच्या पहिल्या आठवड्यानंतर चालू होतात; मात्र या वेळी नवीन शैक्षणिक सत्र २ जानेवारीपासून चालू होत आहे.