सर्वांनी मनापासून नामस्मरण करावे, हीच माझी आवड !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराजांच्या (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या) सहवासात राहिलेले एक गृहस्थ आहेत. देह ठेवण्याच्या आधी १५ दिवस श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘साधारणपणे थोरला मुलगा वडिलांपाशी त्यांच्या सहवासात बराच काळ रहातो. इतर भावंडे त्या मानाने वडिलांच्या सहवासात अल्प वेळ असतात आणि बहुतेक बाहेरगावीही रहात असतात. वडिलांच्या निकट सहवासामुळे थोरल्या मुलास त्यांची आवडनावड यांची चांगली कल्पना आलेली असते. अशा परिस्थितीत वडील गेल्यावर थोरल्या मुलाचे एकच कर्तव्य असते, ते हे की, कुळाची इभ्रत (मान) वाढवण्यासाठी आपल्या वडिलांच्या आवडी असतील, त्या सर्व आपल्या धाकट्या भावंडांना नीट सांगून तसे त्यांनी वागावे, असा उपदेश त्यांना करावा.’ हे सांगून श्रीमहाराज पुढे बोलले, ‘काळ कसा येईल, याचा नेम नाही. माझ्या ज्या आवड-नावड आहेत, त्या तुम्हाला निकटच्या सहवासामुळे ठाऊक आहेत. त्या तुम्ही लोकांना सांगाव्यात. माझी आवड विचाराल, तर ती एकच आहे की, सर्वांनी मनापासून नामस्मरण करावे आणि रामाला कधीही विसरू नये. ही माझी आवड सर्वांना मुक्त कंठाने सांगत जावी.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)