ओटावा (कॅनडा) – कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याला अटक केली आहे. अर्श डल्ला भारतीय नागरिक असून त्याच्यावर पंजाबमध्ये अनेक गुन्हे नोंद असून तो पसार आतंकवादी आहे. या प्रकरणी आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत कॅनडाकडे अर्श डल्ला याला भारताकडे सोपवण्याची मागणी करणार आहे. ‘आम्हाला आशा आहे की, कॅनडा त्याला भारताकडे सुपूर्द करेल’, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
१. भारताने वर्ष २०२३ मध्ये कॅनडाकडे अर्श डल्ला याला अटक करण्याची मागणी केली होती; मात्र कॅनडाच्या सरकारने त्या वेळी ही मागणी फेटाळून लावली होती. जानेवारी २०२३ मध्ये भारताने कॅनडाला डल्लाचा संशयास्पद पत्ता, त्याचे भारतातील व्यवहार, त्याची मालमत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक यांची माहिती दिली होती.
२. डल्ला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात ५० हून अधिक खटले प्रलंबित आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, आतंकवादी कारवाया आणि आतंकवादाला अर्थपुरवठा यांचा समावेश आहे.
३. वर्ष २०२३ मध्ये त्याला आतंकवादी घोषित करण्यात आले. अटक टाळण्यासाठी त्याने पंजाबमधून कॅनडाला पळ काढला आणि तेथून तो कारवाया करू लागला.