योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अन्नाविषयी अनमोल शिकवण

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

१. योगतज्ञ दादाजी यांच्या संकल्पामुळे त्यांना अपेक्षित असा स्वयंपाक करण्यास शिकता येणे

‘योगतज्ञ दादाजी यांच्यासमवेत नाशिक येथे असतांना एके दिवशी त्यांनी मला विचारले, ‘‘तुला स्वयंपाक करता येतो का ?’’ स्वयंपाक करण्याविषयी मला अधिक माहिती नसल्याने मी त्यांना ‘‘मला फारसा येत नाही’’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मला त्यांना अपेक्षित असा स्वयंपाक करायला शिकवतांना प्रथम मऊ भात, तसेच मूगडाळ घालून खिचडी कशी तयार करायची ?, यांचे प्रमाण सांगितले. त्यानंतर अनुक्रमे बटाट्यांच्या काचर्‍या (पातळ फोडी) करून काचर्‍यांना फोडणी कशी द्यायची ? निरनिराळ्या पालेभाज्या कशा तयार करायच्या ?  तिखट, मीठ आणि तेल यांचे किती प्रमाण हवे ? इत्यादी मला सांगितले. त्याप्रमाणे मी काही दिवस स्वयंपाक केला. योगतज्ञ दादाजींना तिखट चालत नसल्यामुळे भाजीच्या चवीपुरतेच तिखट मी घालत असे. त्यांचा संकल्प असल्याने त्यांनी सांगितलेले पदार्थ करायला मी लवकर शिकलो. मी केलेला स्वयंपाक त्यांना आवडू लागला. त्यावर योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘हा अष्टपैलू आहे. याला काही सांगितले तरी येते.’’ माझे कौतुक करून त्यांनी जणू माझा स्वयंपाक करण्याविषयीचा उत्साहच वाढवला. योगतज्ञ दादाजींना अपेक्षित असा स्वयंपाक सिद्ध करण्यास मी शिकल्यानंतर ते साधकांना म्हणाले, ‘‘आता अतुलला जेवण सिद्ध करता येत असल्यामुळे आम्ही दोघेच साधनेसाठी कुठे बाहेर गेलो, तरी आमच्या जेवणाविषयी काही अडचण येणार नाही.’’

श्री. अतुल पवार

२. वयाच्या ९९ व्या वर्षीही योगतज्ञ दादाजी यांनी उत्साहाने प्रत्येक कृती स्वत: करणे अन् इतरांना शिकवणे

योगतज्ञ दादाजी यांना पोह्यांचा पापड न करपता चांगला भाजलेला आवडे. मी त्यांचा स्वयंपाक त्यांना अपेक्षित असा होण्याचा प्रयत्न करीत असल्याने माझ्याकडून पापड न करपता भाजले जात. अन्य कुणाकडून पापड करपल्यावर योगतज्ञ दादाजी म्हणत, ‘अतुल ज्याप्रमाणे पापड भाजतो, तसा भाजायला हवा.’ ते मला नेहमी ‘शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात’, असे मला जाणवायचे. योगतज्ञ दादाजी आम्हाला ‘प्रत्येक कृती आदर्श कशी करायची ?’, हे शिकवत असत. त्यांना प्रत्येक कृती परिपूर्ण आणि नीटनेटकी केलेलीच आवडे. विशेष म्हणजे वय ९९ वर्षे असूनही योगतज्ञ दादाजींना ‘स्वत: करणे आणि इतरांना शिकवणे’, यांविषयी कमालीचा उत्साह होता.

३. अन्न सिद्ध करणार्‍या व्यक्तीच्या आचार आणि विचार यांवर अन्नाची शुद्धता अवलंबून असल्याने योगतज्ञ दादाजींनी अपवादात्मक स्थितीत उपाहारगृहातील पदार्थ खाणे

मी कधीही योगतज्ञ दादाजींनी शिकवण्यापूर्वी स्वयंपाक केला नव्हता. त्यांनी मला स्वयंपाक करण्यास शिकवले आणि त्याची आवड निर्माण केली. योगतज्ञ दादाजी यांचा आहार अल्प असे. त्यांनी पूर्ण जीवनात बाहेरील (उपाहारगृहातील) अन्नपदार्थ कधीच खाल्ले नाहीत. त्यांना उपाहारगृहातील पदार्थ आवडत नसत. अपवाद म्हणून आयुष्यातील शेवटच्या ५ – ६ वर्षांमध्ये प्रवासात असतांना भक्तांच्या इच्छेस्तव बाहेरील अन्नपदार्थ खाण्याचा प्रसंग आला. तेव्हा योगतज्ञ दादाजी सांगत, ‘अन्न सिद्ध करणार्‍यांचे विचार कसे असतात ?’, हे आपल्याला माहीत नसते. त्यांचे विचारच अन्नामध्ये उतरतात. अन्न सिद्ध करणारी व्यक्ती आणि तिचे विचार यांवर अन्नाची शुद्धता अवलंबून असते, तसेच अन्न सिद्ध करतांना त्या ठिकाणची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते.’ योगतज्ञ दादाजींचे योगसिद्धीमुळे आहारावर नियंत्रण होते. त्यांचा आहार अल्प आणि सात्त्विक असे.

४. योगतज्ञ दादाजींनी बालवयातच उत्तम स्वयंपाक करण्याचे कौशल्य अवगत करून घेणे

योगतज्ञ दादाजी बालवयात असतांनाच त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. त्यामुळे वडिलांना साहाय्य व्हावे; म्हणून त्यांनी सर्व स्वयंपाक शिकून घेतला. त्यामुळे स्वयंपाकातील बरेचसे बारकावे त्यांना माहीत होते, उदा. ‘भाकरीचे पीठ मळतांना त्यामध्ये गरम पाणी घालून पीठ मळल्याने भाकरी मऊ होते.’ ते उत्तम स्वयंपाक करत असत.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०२४)