पणजी – नोकरी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सोमवारपर्यंत (१८ नोव्हेंबरपर्यंत) निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग न नेमल्यास राज्यभर आंदोलन करण्याची चेतावणी काँग्रेसने दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी ही चेतावणी दिली.
या वेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले, ‘‘बेरोजगारी दूर करण्यासाठी विद्यमान सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही. नोकरी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री गप्प आहेत. सहस्रो लोकांनी नोकरीसाठी पैसे दिले असावेत. काही भाजपच्या आमदारांचे याविषयीचे ध्वनीमुद्रण प्रसारित होत आहे. लोकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात तक्रारी करायला हव्या. काँग्रेस या लोकांच्या पाठीशी उभी राहील. आगामी विधानसभा अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर आवाज उठवू.
दुसरीकडे भाजपचे आमदार गणेश गावकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून ताम्हणकर यांना ध्वनीमुद्रण कुठे मिळाले ? याची चौकशी करावी, तसेच त्या ध्वनीमुद्रणाच्या खरे-खोटेपणाची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुदिन ढवळीकर यांनी नोकर्यांसाठी कधीच पैसे घेतले नाहीत ! – सावळ
वर्ष २००५ ते २००७ या काळात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. माझ्या १५० ते २०० कार्यकर्त्यांना सरकारी नोकर्या मिळाल्या; मात्र कुणीच पैसे घेतले नाहीत किंवा दिले नाहीत. श्री. सुदिन ढवळीकर मंत्री असतांना त्यांनी नोकर्या दिल्या; परंतु कधी पैसे घेतले नाहीत, असे डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असतांना डिचोली, सत्तरी, पेडणे आणि बार्देश तालुक्यांतील अनेक लोकांना सरकारी नोकर्या मिळाल्या. त्यांनी किंवा त्यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी कधीही पैसे घेतले नाहीत. सध्या सरकारी नोकर्या विकल्या जात आहेत. सध्या माझे वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांच्याशी वैचारिक किंवा त्यांच्या स्वभावामुळे मतभेद असले, तरी त्यांनी कधीही नोकर्यांसाठी पैसे घेतले नाहीत, हे मी ठामपणे सांगतो.’’
नोकरी घोटाळ्याच्या नावाखाली अपकीर्ती केल्याची डॉ. स्नेहा भागवत यांची तक्रार
मडगाव पोलिसांनी नोंदवला अज्ञातांविरुद्ध गुन्हा
मडगाव, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – नोकरी घोटाळ्याच्या नावाखाली एका वृत्तवाहिनीच्या नावे ‘पोस्ट’ टाकून अपकीर्ती केल्याची तक्रार डॉ. स्नेहा भागवत यांनी मडगाव शहर पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून मडगाव शहर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. डॉ. स्नेहा भागवत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, नाहक अपकीर्तीमुळे मला धक्का बसला असून माझी अपकीर्ती केलेल्यांना मी सोडणार नाही. कुणी हे कृत्य केले ते शोधून काढू.
मडगाव येथे नौदलात नोकरी देतो सांगून फसवणूक
मडगाव – १४ नोव्हेंबरला मडगाव पोलीस ठाण्यात सुनील बोरकर यांनी ‘४ वर्षांपूर्वी नौदलात नोकरी देण्याचे आमीष दाखवून २ महिलांनी १६ लाख १२ सहस्र ५०० रुपये लुटले’, अशी तक्रार केली आहे. या प्रकरणी वैश्या विष्णु गावडे (वय ५३ वर्षे) आणि सोनिया सोमनाथ आचार्य या २ महिलांना मडगाव पोलिसांनी १४ नोव्हेंबरला अटक केली.