इमारतीच्या दुरुस्तीला विलंब ही नागरिकांची छळवणूक !
मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी !
मुंबई – कोणत्याही इमारतीच्या दुरुस्तीला होणारा विलंब ही नागरिकांची छळवणूकच आहे, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने हुतात्मा चौक परिसरातील प्रसिद्ध द्वारका हॉटेलस्थित इमारतीच्या दुरुस्तीला होणार्या विलंबाच्या निमित्ताने केली, तसेच महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरेही ओढले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.
उरण-पनवेल मार्ग १४ मीटर रुंद होणार !
उरण – बोकडवीरा पोलीस चौकी ते कोट नाकादरम्यानच्या १६०० मीटर लांबीच्या उरण-पनवेल मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे ७ मीटर रुंद असलेला हा मार्ग आता १४ मीटर रुंद होणार आहे, तसेच या मार्गात दुभाजक बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही काढली आहे; मात्र आचारसंहिता लागू झाल्याने रुंदीकरणाचे काम रखडले आहे. निवडणुकीनंतर काम चालू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.
दुचाकीवरील २ तरुणांकडे सापडली लाखो रुपयांची रक्कम !
सोलापूर – येथील मोहोळ शहरात गस्त करणार्या पोलिसांना विनाक्रमांकाची पाटी असणार्या दुचाकीचालकाकडे १ लाख ४२ सहस्र रुपयांची रक्कम सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे बँकेतून पैसे काढल्याचा पुरावा मागितला; मात्र तो ते देऊ शकले नाहीत.
पोलिसांच्या धाडीत ३ लाखांच्या रसायनासह गावठी दारू नष्ट !
सोलापूर – येथे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांनी अवैध दारू निर्मिती भट्ट्यांवर ३ ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणी ३ लाख १८ सहस्र रुपयांचे गूळमिश्रित रसायनाने भरलेले लोखंडी, प्लास्टिक बॅरल, रबरी ट्यूबमध्ये भरलेली दारू नष्ट करून ६ महिला संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी येथे २ ठिकाणी आणि भांबेवाडी येथे १ ठिकाणी दारू निर्मिती भट्ट्यांवर धाड घातली.
कबाडवाडीत (जुन्नर) बिबट्याचे आक्रमण !
पुणे – जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी येथे बिबट्याने हनुमंत लोखंडे यांच्यावर आक्रमण केले. ते किरकोळ घायाळ झाले. एका ओढ्यात बिबट्या दबा धरून बसला होता. त्याने दुचाकीवर आक्रमण केले. लोखंडे यांच्या पायाला त्याचा पंजा लागला.
आजही मी धर्मनिरपेक्ष; मात्र हिंदु ! – भाजपचे खासदार अशोक चव्हाण
छत्रपती संभाजीनगर – मी आजही धर्मनिरपेक्ष आहे; मात्र हिंदु आहे. हिंदु ‘सेक्युलर’ असू शकत नाही का ? असे मत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. राज्यातील आमचे सरकार सर्व योजना यशस्वीपणे राबवत आहे.