पंढरपूर – रामायण आणि महाभारत दोन्ही एक केल्यावर सर्व सद्गुणांचा समुच्चय म्हणजे छत्रपती शिवराय आहेत. शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक भारताच्या इतिहासातील सर्वोच्च क्षण आहे. सद्य परिस्थितीत देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ शिवछत्रपतींचे चरित्र हाच एकमेव पर्याय आहे. आताच्या काळात हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी हिंदुत्वाच्या सूत्रांचा विचार करून १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले. पंढरपूर येथील आरती मंडप येथे विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘वयाच्या सोळाव्या वर्षापासून भागवत कथा सांगितली; परंतु नुकतेच बांगलादेश येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मी समाजामध्ये शिवचैतन्य जागृत करण्यासाठी काम करत आहे. आताच्या काळात हिंदु संतांनी हिंदु धर्मावर होणार्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करणे आवश्यक आहे.’’ या वेळी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, श्री. आशुतोष बडवे, चातुर्मासे महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्व हिंदु परिषदेच्या आचार्या रेखा किशोरी टाक यांनी केले.