कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वारकर्‍यांसाठी यंदा ८ लाख बुंदीच्या लाडूंचा प्रसाद !

१२ नोव्हेंबर – पंढरपूर कार्तिक यात्रा विशेष !

पंढरपूर – कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला येणार्‍या वारकर्‍यांसाठी गतवर्षी मंदिरे समितीने ६ लाख ५० सहस्र लाडूंचा प्रसाद केला होता. यंदा त्यात वाढ करून वारकर्‍यांसाठी ८ लाख बुंदीचे लाडू सिद्ध करण्यात येत आहेत. ७० ग्रॅम वजनाच्या २ बुंदीच्या लाडूंचा हा प्रसाद वारकर्‍यांना कागदी पिशवीत २० रुपयांमध्ये देण्यात येईल. याच समवेत एकादशीसाठी ५० सहस्र राजगिरा लाडूही देण्यात येणार आहेत. २५ ग्रॅम वजनाचे २ राजगिरा लाडू १० रुपयांना भाविकांना देण्यात येणार आहेत.

या यात्रेत वारकर्‍यांच्या सोयीसाठी १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वेच्या मध्य विभागाच्या वतीने प्रतिदिन मिरज-लातूर-मिरज अशा १४ फेर्‍या धावणार आहेत. मिरज-लातूर ही गाडी मिरज येथून प्रतिदिन सकाळी ७ वाजता सुटेल, तर पंढरपूर येथे सकाळी १०.१५ वाजता पोचेल आणि लातूरला दुपारी ३.३० वाजता पोचेल. लातूर-मिरज ही गाडी लातूर रेल्वेस्थानकातून दुपारी ४ वाजता सुटेल आणि पंढरपूर रेल्वेस्थानकावर रात्री ७.४५ वाजता पोचेल. मिरज रेल्वेस्थानकावर ही गाडी रात्री ११.४५ वाजता पोचेल. या गाडीस १० सामान्य श्रेणीतील डबे असणार आहेत. या गाडीला सर्व थांबे दिल्यामुळे या कालावधीत पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांची सोय होणार आहे.