मराठी माणसाचे कर्तृत्व वाढले, तरच मराठी भाषा मोठी होईल !

साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

डॉ. सदानंद मोरे

पिंपरी (पुणे) – मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात दर्जा’ मिळाला आहे. यानंतर पुढे काय ? याचा विचार करतांना मराठी माणसाचे कर्तृत्व वाढले पाहिजे, तरच मराठी भाषा मोठी होईल. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी आपण काय करणार आहोत ? हे महत्त्वाचे आहे, असे मत ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मांडले. डॉ. मोरे हे ‘पिंपरी-चिंचवड सोशल फाऊंडेशन’ आयोजित २६ व्या ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवा’निमित्त ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, पुढे काय ?’ या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते.

साहित्यिक रामदास फुटाणे म्हणाले की, मराठी भाषेचे आपणच मारेकरी आहोत. आपणच आपली मुले मराठी शाळांमधून शिकवली नाहीत, तर समाजापुढे काय आदर्श ठेवणार ? कला, साहित्य, संगीत, चित्रपट यांच्यावर मराठी भाषा टिकवण्याचे दायित्व आहे. लेखक संजय सोनावणी म्हणाले की, मराठी भाषिकांनीच मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्यासाठी विरोध केला, ही वस्तूस्थिती आहे. राज्यामध्ये १८ सहस्र मराठी शाळा बंद झाल्या आहेत. आपल्याला भाषेविषयी आस्था नाही. केवळ सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही.