NCP Ajit Pawar Group Manifesto : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त प्रतिमास २ सहस्र १०० रुपये देण्याचे आश्‍वासन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे घोषणापत्र प्रसिद्ध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घोषणापत्र प्रसिद्ध करताना

मुंबई – अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारसंघनिहाय निवडणुकीचे घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. या घोषणापत्रामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत सध्या मिळत असलेल्या १ सहस्र ५०० रुपये या निधीमध्ये २ सहस्र १०० रुपये इतकी वाढ करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर या दिवशी बारामती येथे अजित पवार यांनी, तर मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घोषणापत्र प्रसिद्ध केले.

या घोषणापत्रामध्ये निवृत्तीधारकांना प्रतिमास २ सहस्र १०० रुपये अर्थसाहाय्य, वीजदेयकामध्ये ३० टक्के कपात, शेतकर्‍यांना कर्जमाफी, अडीच लाख तरुणांना नोकर्‍या, ४४ लाख शेतकर्‍यांना विनामूल्य वीज, ५२ लाख कुटुंबांना ३ विनामूल्य गॅस सिलेंडर, ग्रामीण भागामध्ये ४५ सहस्र पाणंद रस्त्यांचे (पाणंद रस्ते म्हणजे सर्व शेतकर्‍यांच्या संमतीने आपआपल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते) बांधकाम आदी आश्‍वासने देण्यात आली आहेत. अजित पवार यांनी ‘निवडून आल्यावर १०० दिवसांचे विकासाचे उद्दिष्ट घोषित करू’, असे सांगितले. मतदारसंघातील विकासकामे आणि घोषणापत्र यांच्या माहितीसाठी ९८६१७१७१७१ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • जनतेच्या करातून मिळणार्‍या पैशातून जनतेसाठी सोयीसुविधा निर्माण करून देण्याऐवजी अशा पद्धतीने पैसे वाटण्याची घोषणा करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करणार्‍या पक्षांना निवडणूक आयोगाने जाब विचारला पाहिजे !
  • कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जनतेला अशाच प्रकारचे आमीष दाखवून सत्ता मिळवली आणि आता कर्नाटक सरकारवर कर्जाचा डोंगर निर्माण झाला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीकडे जाऊ लागला आहे. महाराष्ट्राचेही असे झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !