पणजी, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी विविध यंत्रणा कार्यरत असतांना, तसेच कायदेशीरदृष्ट्या अनेक निर्बंध घातलेले असतांना हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीमध्ये दिवाळीच्या सुटीत आठवड्याच्या शेवटी ‘नाईट क्लब’कडून ध्वनीप्रदूषण चालूच होते. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला.
दिवाळीच्या सुटीत मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याच्या शेवटी ओझरात, हणजूण येथील मद्यालये आणि ‘नाईट क्लब’ यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण करण्यात आले. विशेष म्हणजे ‘डायनामो’, ‘रोमियो लेन’, ‘सलुड’, ‘थल्लासा बाय द क्लिफ’, ‘रईथ’, ‘वामोस’, ‘टीटलीस’ आणि ‘नोह’ या नाईट क्लबांकडून मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण करण्यात आले. काही जागरूक नागरिकांनी या ध्वनीप्रदूषणाचे मोजमाप करून तो पुरावा म्हणून स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या; मात्र संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नाही.
संपादकीय भूमिकाप्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याविना असे ध्वनीप्रदूषण होऊच शकत नाही ! |