१. जन्मापूर्वी
अ. ‘मी बाहेर फिरायला जायचे, तेव्हा ‘गर्भ आनंदाने हालचाल करायचा’, असे मला जाणवत असे.
आ. सोनोग्राफी (टीप) करतांना गर्भ शांत असायचा. तेव्हा ‘गर्भाला ते आवडत नाही किंवा आधुनिक वैद्यांची भीती वाटते’, असे मला वाटत असे.
(टीप : विशिष्ट ध्वनीलहरीच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी)
इ. यजमानांच्या मित्राची लहान मुलगी तारा हिने माझ्या पोटावर हात ठेवला, तेव्हा ‘गर्भाने हालचाल करून तिला प्रतिसाद दिला’, असे मला आणि तारालाही वाटले.
ई. माझ्या ओटीभरणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी गर्भाची पोटात पुष्कळ हालचाल होत होती. तेव्हा ‘जणू गर्भाला कार्यक्रमाला आलेल्या ५ लहान मुलींच्या समवेत खेळायचे आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. शुभांगी मयूर अवघडे (चि. मीराची आई)
उ. ‘सून शुभांगीला गर्भधारणा झाल्यावर तिसर्या मासात शुभांगी आणि माझा मुलगा मयूर (चि. मीराचे वडील) या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा पू. भावनाताई मला म्हणाल्या, ‘‘बाळ स्वतः भोवती चांगले संरक्षककवच घेऊन येणार आहे.’’
ऊ. ‘११.४.२०२३ या दिवशी एक स्त्री संत आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘गर्भ मला नमस्कार करत आहे आणि मीही त्याला नमस्कार करत आहे’, असे मला वाटले.’’
ए. त्या स्त्री संत मला म्हणाल्या, ‘‘गर्भातील बाळानेच तुम्हाला (आजी-आजोबांना (चि. मीराच्या वडिलांचे आई-वडील यांना)) अमेरिकेला आणले आहे.’’
– सौ. शशिकला अवघडे (चि. मीराची आजी (वडिलांची आई )), पुणे.
ऐ. ‘मार्च २०२३ मध्ये मी मयूरकडे १ मासासाठी अमेरिकेत गेलो होतो. तेव्हा शुभांगी गर्भवती होती. मला तेथील घरामध्ये वेगळे चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.’
– श्री. विश्वनाथ अवघडे (चि. मीराचे आजोबा (वडिलांचे वडील)), पुणे.
२. वय जन्म ते ३ मास
अ. ‘जन्मापासून बाळ ६ मासांचे होईपर्यंच तिच्या अंगावर बर्याच वेळा चंदेरी आणि गुलाबी रंगाचे दैवी कण दिसत असत.’ – सौ. शुभांगी मयूर अवघडे
आ. ‘ती २ मासांची असतांना संध्याकाळी पुष्कळ रडत असे आणि झोपत नसे. तेव्हा श्रीरामाचा पाळणा लावल्यावर ती शांत झोपायची. तेव्हापासून ती प्रतिदिन श्रीरामाचा पाळणा ऐकत झोपते.’
– श्री. मयूर विश्वनाथ अवघडे (चि. मीराचे वडील)
इ. ‘चि. मीराला अंघोळ करायला आवडते.
ई. ‘तिची दृष्टी ३ आठवड्यांतच स्थिर झाली. ती समोरच्या व्यक्तीच्या चेहर्याकडे पहायला लागली.
उ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा उत्सव चालू होता. तेव्हा मी तिच्याशी बोलतांना ती प्रथमच माझ्याकडे पाहून हसली. तेव्हा ती केवळ सव्वा मासाची होती.’
३. वय ४ मास ते ६ मास
अ. ‘ती रडत असतांना तिला देवघरातील देव दाखवल्यावर ती लगेच शांत होते.
आ. ती ६ मासांची झाल्यावर तिला ‘व्हिडिओ कॉल’ कळू लागला. ती समोरील व्यक्तीकडे पाहून ‘हसणे, हुंकार देणे आणि त्यांना पकडायचा प्रयत्न करणे’, असे करू लागली.’
इ. ‘तिला स्वयंपाकघरात यायला आवडते. आपण जी कृती करत असू त्याकडे ती अतिशय लक्षपूर्वक पहाते.
ई. तिला बाहेर फिरायला आवडते. ती लहान-सहान गोष्टींचे निरीक्षण करते. ती पाने, फुले, प्राणी आणि पक्षी यांच्याकडे लक्षपूर्वक पहाते अन् त्यांच्याशी काहीतरी बोलते.
उ. तिला लहान मुले आवडतात. लहान मुलांनाही तिला पाहून आनंद होतो.
– सौ. शशिकला अवघडे
ऊ. ‘अनोळखी जागी गेल्यावर मीरा थोडा वेळ आजूबाजूचे बारीक निरीक्षण करते किंवा अनोळखी व्यक्ती जवळ आल्यावर तिचेही निरीक्षण करते. तिला निश्चिती वाटल्यावरच ती त्या व्यक्तीकडे जाते.
ए. ‘चि. मीरा ६ मासांची असतांना आम्हाला मराठी बोलणार्यांचा भ्रमणभाष आल्यावर ती आनंदी असायची; परंतु इंग्रजी बोलणार्यांचा भ्रमणभाष आल्यावर ती रडून आम्हाला भ्रमणभाषवर बोलू देत नसे.
ऐ. ‘प.पू. बाप्पा कुठे आहेत ?’, असे म्हटल्यावर ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, या ग्रंथाकडे पाहून हसते.’
– श्री. मयूर विश्वनाथ अवघडे
४. वय ७ मास ते ९ मास
अ. ‘मीरा पुष्कळ शांत आहे. ती विनाकारण रडत नाही किंवा चिडचिड करत नाही.
आ. मीराला काहीतरी नवीन पहायला आणि शिकायला आवडते. तिला पुस्तकातील चित्रे पहायला आवडतात. जर पुस्तक उलटे असेल, तर ती सरळ करते आणि मोठ्या माणसांप्रमाणे पहाते.’
– सौ. शुभांगी मयूर अवघडे
५. वय १० ते १२ मास
अ. तिची दृष्ट काढण्यापूर्वी आम्ही ‘श्री हनुमते नमः’ हा नामजप करतो. तेव्हा ती हसते आणि डोलते.
आ. तिला सनातन पंचांगामधील देवतांची चित्रे पहायला आवडतात. नवीन मासाचे पान पालटल्याचे तिच्या लक्षात येते आणि ती नवीन चित्राकडे एकटक पहाते.
इ. तिचा चेहरा सात्त्विक अणि गोड आहे. तिचे छायाचित्र पाहून अनेक जणांनी तसे सांगितले आहे.’
– सौ. शशिकला अवघडे
ई. ‘एप्रिल २०२४ मध्ये आम्ही २ मासांसाठी चि. मीराकडे अमेरिकेत गेलो. तेव्हा पुन्हा मला तेथील घरामध्ये वेगळेच चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली.
उ. ‘तिच्याशी खेळतांना मला जांभया येऊन मला चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटते.
ऊ. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून ती पुष्कळ आनंदी होते. तिला बोलता येत नसूनही ती त्या छायाचित्रांकडे बघून बोलायचा प्रयत्न करते’, हे पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटते.
ए. तिचा जन्मदिनांक २९ मे आहे आणि तोच आमच्या विवाहाचाही दिनांक आहे. यावरून ‘हे बाळ, म्हणजे परम पूज्यांनी आमच्या विवाहाच्या वाढदिवसाची आम्हाला दिलेली भेट आहे’, असे मला वाटते.’
– श्री. विश्वनाथ अवघडे
ऐ. ‘वयाच्या मानाने चि. मीराची निरीक्षणशक्ती आणि जिज्ञासूवृत्ती पुष्कळ आहे.
ओ. मीरा कायम उत्साही असते. ती अन्य बाळांप्रमाने सहसा रडतांना किंवा त्रासलेली दिसत नाही.’
– श्री. विनित अवघडे आणि सौ. अभया अवघडे (चि. मीराचे काका-काकू, पुणे)
(सर्व सूत्रांचा दिनांक २.६.२०२४)