‘एका जिल्ह्यात एका नवीन प्रशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींशी मी संवाद साधला. त्यानंतर त्या प्रसंगाचा विचार केला. तेव्हा मला श्री गुरूंविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१. धर्मप्रेमींना वाटणारी काळजी आणि त्यावर साधकाने त्यांना पटवून दिलेले साधनेचे महत्त्व !
धर्मप्रेमी : ‘बाह्य परिस्थिती बघून, घडणार्या घटना बघून कसे होणार ? काय होणार ?’, या विचारानेच कधी कधी भीती वाटते. ‘काय करायचे ?’, ते सुचत नाही. विचारांचा गोंधळ चालू असतो. ‘स्थिरता, शांतता पाहिजे’, असे वाटते.
श्री. हर्षद खानविलकर : (गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या मुखातून पहिलेच वाक्य आले) निर्भयता आणि स्थिरता ही साधनेमुळेच येऊ शकते. देव आणि गुरु यांच्यावर श्रद्धा असावी लागते. आज हिंदु जनजागृती समितीचे अनेक साधक अन् साधिका आहेत. साधिका अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये रात्रीपर्यंत एकट्या अनोळखी क्षेत्रांत, तसेच विभागांत धर्मप्रसार करत आहेत; पण कधी ‘कोणाला भीती वाटली’, असे कोणाच्या मुखातून एवढ्या वर्षांत आम्ही ऐकले नाही. याचे कारण गुरुदेव जी साधना करून घेत आहेत, त्यामुळे प्रत्येक साधक निर्भय आणि स्थिर राहून तसेच ‘गुरु आणि देव माझ्यासोबत आहेत’, अशा अखंड भावाने सेवा करतो आहे. आजपर्यंत गुरूंच्या कृपेने कुणाला कोणतीच अडचण आली नाही.
(मी असे उत्तर दिल्यावर ‘त्या धर्मप्रेमीची नकारात्मकता न्यून होऊन त्यांना आधार मिळाला’, असे मला वाटले. त्या धर्मप्रेमींचा भावही चांगला होता.)
धर्मप्रेमी : ‘आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला यायला हवे होते आणि स्वराज्यासाठी लढता लढता आपले बलीदान झाले असते, तर बरे’, असे कधीतरी वाटते
श्री. हर्षद खानविलकर : कदाचित् त्या काळात आपण असूही आणि ‘हिंदु राष्ट्रा’ च्या रूपाने आता पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या संधीसाठी देवाने आपली निवड केली आहे.’
२. धर्मप्रेमींशी झालेल्या संवादानंतर श्री. हर्षद खानविलकर यांची झालेली विचारप्रक्रिया !
२ अ. समाजातील विदारक स्थितीमुळे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला काळजी वाटत असणे : आज समाजामध्ये आपली मुले (मुलगा किंवा मुलगी) थोडी जरी उशिरा घरी आली, तरी घरच्यांना काळजी वाटते. लगेच त्यांना भ्रमणभाष केले जातात आणि त्यांचा शोध घेतला जातो. ‘स्वतः समवेत कोणताही प्रसंग घडलेला नाही, तरीही बाहेरील परिस्थिती, समाजातील विविध दृश्यपट बघून आणि वृत्ते वाचून समाज किती भयभीत आहे’, हे माझ्या लक्षात आले.
२ आ. ‘गुरुदेवांनी साधकांकडून साधना करून घेऊन निर्भय आणि स्थिर बनवले’, या विचाराने कृतज्ञता वाटणे : आज गुरुदेवांच्या कृपेने अनेक साधक साधना अन् सेवा करत आहेत. अनेक वर्षांपासून स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनोळखी जिल्हे किंवा राज्ये येथे जाऊन धर्मप्रसार करतात. विविध सभा, कार्यक्रम, व्याख्याने, धर्मावर होणारे आघात, आंदोलने इत्यादींमधून राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती समाजात निर्भीडपणे मांडतात. हे सर्व करून ते रात्री प्रवास करून निवासस्थानी परत येत असतात. जे साधक किंवा साधिका सेवा आणि संपर्क यांसाठी उशिरापर्यंत बाहेर असतात, त्यांच्याही मनात कधी भीतीचा विचार येत नाही. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे ‘गुरुदेव एवढी वर्षे नामजप साधना करायला सांगत आहेत आणि साधकांकडून ती करूनही घेत आहेत.’ याच साधनेच्या बळामुळे आज सहस्रो साधक परिस्थिती कितीही कठीण आली, तरी निर्भीडपणे स्थिर राहून साधना करत आहेत.
२ इ. ‘साधना वाढली, तरच आपत्काळात तरून जाऊ’, असे गुरुदेवांनी सांगितलेले असणे : गुरुदेव नेहमी सांगतात, ‘साधना वाढवा. आपत्काळाच्या आधी आपली साधना वाढली पाहिजे. साधना केल्यामुळेच आपण येणार्या भीषण काळात तरून जाऊ शकतो’, हे गुरुदेवांचे सगळे विचार त्या वेळी माझ्या मनात आले.
२ ई. स्वतःसमवेत समाजाचीही साधना होण्यासाठी तीव्र प्रयत्न करणे आवश्यक असल्याची जाणीव होणे : ‘समाजालाही साधनेची किती आवश्यकता आहे आणि समाजाकडून साधना करून घेण्यासाठी आपणही किती प्रयत्न करायला पाहिजेत, जेणेकरून धर्म यांची समाजही निर्भय बनेल अन् समाज आणि राष्ट्र यांचाही योग्य दिशेने उद्धार होईल’, असे मला वाटले.
वरील विचारप्रक्रियेच्या माध्यमातून गुरुदेवांच्या कृपेने साधनेचे महत्त्व गुरुदेवांनीच पुन्हा एकदा लक्षात आणून दिले आणि आजवर त्यांनी जी आमची काळजी घेतली आहे, त्यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्रीगुरुचरण सेवक,
श्री. हर्षद खानविलकर (युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती) (१७.१०.२०२४)